अखेर उद्धव- राज यांची युती जाहीर !! मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार

Foto
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील राजकीय युतीची अधिकृत घोषणा अखेर आज झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांपासून दूर असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अखेर महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी एकत्र आले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांपासून दूर असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अखेर महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी एकत्र आले आहेत. यावेळी मंचावर उद्धव आणि राज यांच्यासह संजय राऊतही व्यासपीठावर होते.

जे काही बाकी बोलायचं ते जाहीर सभेत बोलू. माझी एक मुलाखत झाली होती. मी मुद्दामहून आठवण करून देतो. त्यात मी म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. तिथून एकत्र येण्याची सुरुवात झाली. त्या वाक्यापासून झाली. कोण किती जागा लढवणार, आकडा काय हा नाही सांगणार तुम्हाला. महाराष्ट्रात सध्या लहान मुलं पळवण्याच्या टोळ्या फिरत आहे. त्यात दोन जास्त टोळ्या अ‍ॅड झाल्या. त्या राजकीय पक्षातील टोळ्या पळवतात. जे निवडणूक लढवत आहेत. त्या सर्व उमेदवारांना उमेदवारी दिली जाईल. कधी भरायची ती कळवली जाईल. महाराष्ट्र ही प्रतिक्षा करत होता. शिवसेना आणि मनसेची युती झाली हे जाहीर घोषणा करत आहोत.

राज ठाकरे काय म्हणाले?


जाहीर सभा सुरु झाल्या की बाकी बोलायचं ते बोलू. माझी एक मुलाखत झाली होती, त्यात मी म्हटलं होतं की कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. त्या वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली. कोण किती जागा लढवणार, आकडा काय, हे नाही सांगणार. महाराष्ट्रात लहान मुलं पळवणार्‍या टोळ्या आहेत. त्यात दोन टोळ्या जास्त झाल्यात, ते राजकीय पक्षातील मुलं पळवतात. ज्याची अनेक दिवस वाट पाहिली जात होती, शिवसेना आणि मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करत आहोत.

दानवांना उत्तरे नाही...

उद्धव ठाकरे यांची ही शेवटची निवडणूक असेल, असं रावसाहेब दानवे म्हणाले होते, त्यावरुन पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, राज ठाकरे यांनी देवांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावीत, दानवांच्या प्रश्नांना नाही अशी कोटी करत हशा पिकवला. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार, अशी घोषणाही राज ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री अल्ला हाफिज बोलतानाचा एक व्हिडिओ फिरतोय. माझ्याकडे खूप व्हिडिओ आहेत, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत. मी मागेच सांगितलं होतं की आम्ही एकत्र आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठी. मी सर्वांना सांगतो की यापुढे मुंबईवरती आणि महाराष्ट्रावर कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं किंवा कपटी मनाने पाहिलं तर त्यांचा खात्मा केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीफफ, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मराठी माणसाने बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली. त्याची आठवण आज होणं साहजिक आहे. आमच्या दोघांचेही आजोबा प्रबोधनकार हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातल्या पहिल्या पाच सेनापतींमधील एक होते. माझे वडील बाळासाहेब ठाकरे, राजचे वडील श्रीकांत ठाकरे म्हणजे आख्खं ठाकरे घराणं मुंबईसाठी तेव्हा संघर्ष करत होतं. त्यानंतरचा इतिहास मी तुम्हाला सांगत बसत नाही. पण महाराष्ट्राने मुंबई मिळवल्यावर मुंबईतच मराठी माणसाच्या उरावर उपरे नाचायला लागले आणि न्याय्य हक्क्सांसाठी बाळासाहेब ठाकरेंना शिवसेनेला जन्म घालावा लागला. मधली वर्षं व्यवस्थित गेली. पण आज पुन्हा एकदा मुंबईचे लचके तोडायचे मनसुबे दिल्लीतल्या दोघांचे आहेत. आत्ता जर आपण भांडत राहिलो, तर मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाचा अपमान असेल. आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

यापुढे मुंबईवर आणि महाराष्ट्रावर कुणीही वाकड्या नजरेनं किंवा कपटी कारस्थानांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करेल, त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत. मी सगळ्या मराठी जनांना सांगतो, आता जर चुकाल, तर संपाल. आता फुटाल, तर पूर्णपणे संपून जाल. त्यामुळे तुटू नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका. मराठी माणूस सहसा कुणाच्या वाटेला जात नाही. पण त्याच्या वाटेला जर कुणी आलाच, तर त्याला परत जाऊ देत नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक अत्यंत ऐतिहासिक आणि भावनिक क्षण पाहायला मिळणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही बंधू अनेक वर्षांच्या राजकीय संघर्षानंतर अखेर आज एकत्र येणार आहेत. ठाकरे मनसे यांच्या अधिकृत युतीच्या घोषणेपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र एकाच गाडीतून प्रवास केला. ते राज ठाकरेंच्या निवासस्थानावरुन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्ककडे रवाना झाले.

आतापर्यंत काय काय घडलं?

संजय राऊत यांनी मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार असल्याबद्दलची माहिती काल दिली होती. या ट्वीटनंतर सर्वांमध्ये एक नवा उत्साह संचारल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आज सकाळपासूनच वरळीतील ब्लू सी या हॉटेलमध्ये वेगवान घडामोडी घडताना दिसत आहे. या ठिकाणी पत्रकार परिषदेचे जय्यत तयारी केली जात होती. या पत्रकार परिषदेपूर्वी उद्धव ठाकरे हे वांद्य्रातील मातोश्री या निवासस्थानावरुन राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी राज ठाकरेंच्या मातोश्रींनी राज आणि उद्धव यांचे एकत्र औक्षण केले. यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंब पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे.
सर्वात विशेष बाब म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी शिवतीर्थ ते स्मृतिस्थळ असा प्रवास एकाच गाडीतून केला. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. तर दुसर्‍या गाडीतून रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे स्मृतिस्थळाकडे रवाना झाल्या. ठाकरे कुटुंबियांना एकत्र पाहून शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला होता. यावेळी शिवाजी पार्क परिसरात हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.

उपराजधानी नागपुरातही उत्साहाचे वातावरण

या युतीच्या बातमीने केवळ मुंबईतच नव्हे, तर उपराजधानी नागपुरातही उत्साहाचे वातावरण आहे. नागपुरातील मानकापूर परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र आल्याने आता महाराष्ट्रात नवा बदल घडेल, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या युतीचा मुख्य भर मुंबई महानगरपालिकेवर असून जागावाटपाचा आकडाही जवळपास निश्चित झाला आहे. यानुसार शिवसेना ठाकरे गट १४५ ते १५० जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे बोललं जात आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ६५ ते ७० जागा, इतर मित्रपक्ष १० ते १२ जागांवर लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच दादर, माहीम आणि शिवडी यांसारख्या मराठीबहुल मतदारसंघांतील पेच सोडवण्यासाठी दोन्ही नेत्यांनी समजूतदारपणाची भूमिका घेतल्याचे समजते.