मुंबई: राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत मोठी राजकीय खेळी झाल्याचे दिसून आले. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र, त्याआधी मातोश्री ते दिल्लीतील 10 जनपथपर्यंत हालचाली झाल्या. काँग्रेसच्या पडद्यामागे हालचाली आणि ठाकरे गटाच्या अटीनंतर राज्यसभेची जागा ही शरद पवार यांच्यासाठी सोडण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात राज्यसभेच्या 7 जागांवर निवडणूक होणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार, महायुतीच्या 6, महाविकास आघाडीची एक जागा विजयी होण्याची चिन्हे आहेत. मविआच्या वाट्याला आलेल्या जागेवर शरद पवार यांना पुन्हा संधी देण्यात आली. मात्र, त्याआधी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या जागेवर आपल्या पक्षाचा दावा सांगितला. तर, काँग्रेसनेही ही जागा मिळावी यासाठी आग्रह धरला होता.
शरद पवार यांच्या उमेदवारीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अत्यंत कडक अट घातली असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कोणत्याही परिस्थितीत एनडीएशी हातमिळवणी करणार नाही किंवा विलीनीकरण करणार नाही, असे जाहीर वचन मिळाल्यानंतरच ठाकरे यांनी पवारांच्या नावाला हिरवा कंदील दाखवल्याचे वृत्त पुढारीने दिले आहे.
मातोश्रीवरील खलबते आणि सुप्रिया सुळेंची भेट
मंगळवारी रात्री उशिरा मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्यात महत्त्वाची चर्चा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. जोपर्यंत राष्ट्रवादी गट विलीनीकरणाची चर्चा पूर्णपणे थांबवत नाही आणि भाजपसोबत न जाण्याची ग्वाही देत नाही, तोपर्यंत पाठिंबा मिळणार नाही. विशेष म्हणजे, काँग्रेसचीही हीच अंतर्गत इच्छा होती की शिवसेनेने पवारांकडून हा शब्द घ्यावा.
खर्गे-राहुल गांधी, सोनिया गांधींचा ग्रीन सिग्नल
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी सातत्याने संपर्क साधून शरद पवार यांच्या उमेदवारीबाबत चर्चा केली होती. विलीनीकरणाच्या अफवा आणि वाढते वय यामुळे काँग्रेसच्या काही नेत्यांमध्ये द्विधा मनस्थिती होती. राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या विषयावर गांभीर्याने विचारविनिमय केला होता. अखेर हा विषय सोनिया गांधी यांच्याकडे पोहोचला. सोनिया गांधी यांनी अत्यंत प्रगल्भ राजकीय भूमिका मांडली. शरद पवार यांना उमेदवारी न दिल्यास आघाडीच्या ऐक्यावर चुकीचा परिणाम होईल आणि इंडिया आघाडीच्या प्रतिमेला धक्का बसेल, असे त्यांनी सुचवले. सोनिया गांधींच्या या आग्रहामुळे काँग्रेस नेतृत्वाने शरद पवारांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला आणि प्रलंबित प्रश्न निकाली निघाला.
जयंत पाटलांचे वक्तव्य अन् उमेदवारीवर शिक्कामोर्तब
ठाकरेंच्या या आक्रमक पवित्र्यानंतर बुधवारी सकाळी चक्र वेगाने फिरली. माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विलीनीकरणाची चर्चा आता जुनी झाली असून ती मागे पडली आहे, असे जाहीर विधान केले. या विधानानंतरच शिवसेना उबाठाने पवारांच्या उमेदवारीला औपचारिक मान्यता दिली. उमेदवारी निश्चित झाली असली तरी, काँग्रेस मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला शिवसेना उबाठाचा एकही बडा नेता उपस्थित नव्हता. सुप्रिया सुळे आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी ही परिषद घेतली, मात्र शिवसेनेच्या अनुपस्थितीमुळे महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.