मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी देशातील जनतेला सावध करताना काही महत्वाची आवाहने केली होती. त्यानंतर मागच्या ४८ तासात एकापाठोपाठ एक अनेक गोष्टी महागल्या आहेत. देशातील जनतेवर महागाईने चहूबाजूंनी हल्लाबोल केला आहे. सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ झाली. सोन्या-चांदीचे भाव वाढले. फक्त सोनेच नाही, यानंतर देशात दूधाचे दर वाढले. सीएनजीच्या किंमती वाढल्या. आता पेट्रोल-डिझेल दरवाढ झाली आहे. हे एकप्रकारे महागाईचा बॉम्ब फुटण्यासारखचं आहे. शुक्रवारी १५ मे रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली. पेट्रोल-डिझेल प्रति लीटर ३ रुपयांनी महागले आहे.
रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परकीय चलन वाचवण्यासाठी देशातील जनतेला वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलं. त्यानंतर २४ तासात पुन्हा तेच आवाहन केलं. त्यानंतर सरकारने अचानक सोन्यावरील आयात शुल्क वाढवलं. पासून देशातंर्गत बाजारपेठेपर्यंत सोन्या-चांदीच्या दराने उसळी घेतली. आयात शुल्क वाढवल्याची बातमी येताच सोनं ११ हजार रुपये आणि चांदी २२ हजार रुपयापर्यंत महागली.
नव्या किंमती १४ मे पासून
सोन्या-चांदीच्या दरानंतर महागाईचा दुसरा बॉम्ब दुधावर फुटला. अमूलपासून मदर डेयरी पर्यंत पॅकेज्ड दूधाच्या किंमती वाढवून देशातील जनतेला झटका दिला आहे. अमूल दुधाच्या किंमतीत प्रति लिटर २ रुपये वाढ झाली. त्यानंतर मदर डेअरीने सुद्धा आपले दर २ रुपयांनी वाढवले. नव्या किंमती १४ मे पासून देशभरात लागू होतील.
मुंबईत पेट्रोलचा नवीन दर काय?
दूधा नंतर पेट्रोल-डिझेलचे दर वाढले. शुक्रवारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांची वाढ केली. नव्या किंमती १५ मे पासून देशभरात लागू होतील. ३ रुपये दरवाढीनंतर दिल्लीत आता प्रति लिटर पेट्रोल ९७.७७ रुपये असेल. कोलकात्यात १०८.७४ रुपये, मुंबईत १०६.६८ रुपये, चेन्नईत १०३.६७ रुपये असेल. डीझेलबद्दल बोलायचे झाल्यास दिल्लीत प्रति लिटर डिझेल ९०.६७ रुपये, कोलकात्यात ९५.१३ रुपये, मुंबईत ९३.१४ रुपये आणि चेन्नईत ९५.२५ रुपये प्रति लीटर नवीन दर असेल.
सीएनजीचे रेट सुद्धा वाढले
फक्त पेट्रोल-डिझेलचेच दर वाढलेले नाहीत तर सीएनजीचे रेट सुद्धा वाढले आहे. याचा रिक्षा, टॅक्सी चालकांना मोठा फटका बसणार आहे. मुंबईनंतर आता दिल्लीतही १५ मे पासून सीएनजी महाग झाला आहे. दिल्लीत आता प्रतिकिलो सीएनजीचा दर ७९.०९ रुपये आहे.
पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार?
मुंबई : वाढत्या महागाईमुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या जखमेवर आता पुन्हा एकदा मीठ चोळले गेले आहे. देशात आजपासून (१५ मे २०२६) इंधन दरात प्रति लिटर ३ रुपयांहून अधिक वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याने जीवनावश्यक वस्तू, प्रवास खर्च आणि बचतीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ
डिझेलच्या किमती वाढल्यामुळे ट्रक आणि टेम्पो यांसारख्या मालवाहतुकीचा खर्च वाढतो. याचा थेट परिणाम भाजीपाला, फळे, दूध आणि अन्नधान्य यांसारख्या रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमतींवर होतो. मालवाहतूक महागल्याने ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत या वस्तूंच्या किमती ५ ते १० टक्क्यांनी वाढू शकतात.
मासिक प्रवास खर्चात वाढ
टू-व्हीलर किंवा फोर-व्हीलर वापरणार्या नोकरदारांच्या इंधनावरील मासिक खर्चात किमान ५०० ते १,५०० रुपयांची वाढ होऊ शकते. तसेच रिक्षा, टॅक्सी आणि खाजगी बसच्या भाड्यांमध्येही वाढ होण्याची शक्यता असते. शिवाय, एसटी किंवा बसची भाडेवाढ झाल्यास रोज प्रवास करणार्यांच्या बजेटवर मोठा ताण येतो.
बचतीवर परिणाम
घरगुती खर्चात वाढ झाल्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांच्या बचतीमध्ये घट होते. गुंतवणुकीसाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीसाठी बाजूला काढले जाणारे पैसे इंधन आणि महागाईमुळे खर्च करावे लागतात.
केंद्र सरकारविरोधात काँग्रेस, सपा आक्रमक
पेट्रोल-डिझेल, सीएनजी आणि इतर वस्तूंच्या किंमती वाढल्यानंतर विरोधक केंद्र सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केंद्र सरकारला घेरले. ते म्हणाले, ङ्गङ्घमहागाईच्या काळात मोदींनी लोकांवर आसूड उगारला आहे. पेट्रोल-डिझेल प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले आहे. तर सीएनजीचे दरही २ रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. निवडणूक संपताच मोदींची वसुली सुरू झाली आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही सरकारवर टीका करताना म्हटले की, निवडणुका संपताच भाजपा सरकारने जनतेला महागाईची आणखी एक भेट दिली आहे. पेट्रोल-डिझेल ३ रुपयांनी महागले आहे. लोक आधीच महागड्या गॅस, वीज बिलामुळे त्रस्त आहेत. आता पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून सरकारने लोकांचे कंबरडेच मोडले आहे. आता भाजपा नकोच.