औरंगाबाद : अवैधरीत्या गौण खनिज वाहतूक करणारा ट्रॅक्टरचालक बाळू रिंढे आत्महत्या प्रकरणातील गुंता वाढत चालला आहे. पोलिस आणि महसूल प्रशासन आमनेसामने आले असून, पोलिसांनी खरा गुन्हेगार शोधावा, असे आव्हान महसूल संघटनेने दिले आहे, तर आम्ही योग्य ती कारवाई केली, असा खुलासा पोलिस प्रशासनाने दै.सांजवार्ताशी बोलताना केला आहे. एकंदरीत या प्रकरणाने महसूल विभागातील कामे ठप्प झाली आहेत. गुन्हा दाखल झालेल्या ट्रॅक्टरचालक बाळू रिंढे याने कन्नड उपविभागीय अधिकार्यांच्या कार्यालयासमोर आत्महत्या केल्याचे प्रकरण चांगलेच गाजते आहे. याप्रकरणी मंडळ अधिकार्यावर गुन्हा दाखल झाल्याने महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनेचे गेल्या पाच दिवसांपासून लेखणी बंद आंदोलन सुरू आहे.
त्यामुळे ऐन दुष्काळातच जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तालुक्यातील तहसील कार्यालयाचे कामकाज विस्कळीत झाले आहे. बापू रिंढेे प्रकरणात आम्ही योग्य प्रकारे कारवाई केल्याचा दावा कन्नडचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजगुरू यांनी दै. सांजवार्ता प्रतिनिधींशी बोलताना केला. महसूल संघटनेचे आरोप फेटाळून लावताना याप्रकरणी अधिक चौकशी करणार असल्याचेही ते म्हणाले. दुसरीकडे बापू रिंढे प्रकरणात मंडळ अधिकार्यावर गुन्हा दाखल करणे दुर्दैवी आहे. वरिष्ठांच्या आदेशाने मंडळ अधिकार्यांनी कारवाई केली होती. गुन्हा दाखल केल्यानेच आत्महत्या केली असे कसे म्हणता येईल. कारण वेगळेही असू शकते. हा पोलिस तपासाचा भाग आहे. मात्र, कर्तव्य बजावणार्या अधिकार्यावर पोलिसांनी घाईघाईत गुन्हा दाखल केला. एकंदरीत बापू रिंढे प्रकरण चिघळत चालले आहे. महसूल कर्मचारी संघटना लेखणी बंद आंदोलनावर ठाम असून, गेल्या पाच दिवसांपासून कामकाज ठप्प झाले आहे.