वरुड-काजी येथील घटना, अग्निशमन दलाची पाच तास आगी सोबत झुंज
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : वरुड - काजी परिसरातील रामपूर शिवारात असलेल्या सोलार पॅनलच्या गोडावूनला आग लागून जवळपास तीन ते साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान झाले. ही घटना सोमवार, २३ मार्च रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच तास झुंज देत आगीवर नियंत्रण मिळवले असल्याची माहिती मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांनी दिली.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, प्रतीम जैन, रा. छत्रपती संभाजीनगर यांची एव्हीआय रिजनेबल एनर्जी प्रा.लि. नावाने सोलार पॅनलची कंपनी आहे. वरुड-काजी परिसरातील रामपूर शिवारात १ एकर ४० गुंठे जमिनीत कंपनीचे सोलार पॅनल, पॅनल फिटींगसाठी लागणारे साहित्य, वायरिंग आदी ठेवण्याचे गोडावून आहे. कंपनीच्या आवारात ठेवलेल्या सोलार पॅनल व इतर साहित्याला सोमवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली.
या घटनेची माहिती मिळताच मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर,
उपअग्निशमन अधिकारी विजय राठोड, विनायक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चिकलठाणा अग्निशमन केंद्राचे ड्युटी अधिकारी सोमनाथ भोसले, सिडको एन-९ अग्निशमन केंद्राचे ड्युटी अधिकारी हरिश्चंद्र पवार, अग्निशामक जवान किरण शेलार, परमेश्वर साळुंखे, नंदकुमार आरक, रामेश्वर हरणे, परमेश्वर बमणे, वाहन चालक रतन बहुरे, शंकर दुबे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
अग्निशमन दलाचे दोन बंब आणि खासगी दहा ते बारा टँकरच्या सहाय्याने तब्बल पाच तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. परंतु तोपर्यंत सोलार पॅनलचे साहित्य, वायरिंग आदी जळून खाक झाले होते. एव्हीआय रिजनेबल एनर्जी प्रा. लि. आवारात कंपनीच्या गोडावूनच्या असलेल्या साहित्याला आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू न शकल्याचे चिकलठाणा अग्निशमन केंद्राचे डयुटी अधिकारी सोमनाथ भोसले यांनी सांगितले.












