अमरावती : अमरावतीमध्ये आज पहाटे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला आग लागली. या आगीत तीन लहान बालकांचा होळपळून मृत्यू झाला. पहाटे ३.३० वाजता नवजात शिशु अतिदक्षता विभागात अचानक आग लागली. व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने ही आग लागली. जिल्हा स्त्री रुग्णालयातील तिसर्या माळ्यावर असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता कक्षाला पहाटे ३.३० वाजता अचानक व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने आग लागली. ९ लहान बाळांना याठिकाणी ठेवले होते. या नवजात शिशु अतिदक्षता विभागात मध्ये एकूण नऊ बालकांवर उपचार सुरु होते. यात तीन बालकांचा मृत्यू झाला. सहा बालकांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटनेत आई-वडिलांनी आपल्या कोवळ्या बाळांना गमावलं आहे. निशब्द, मन सुन्न करणारी ही घटना आहे. रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सर्वसामान्यांच्या मनात या घटनेबद्दल चीड, संतापाची भावना आहे.
ज्या बालकांचं वजन कमी असतं, ज्या मातांची सातव्या महिन्यात प्रसुती होते, ज्या बालकांना जन्मल्यानंतर वाढीमध्ये काही समस्या असतात किंवा डॉक्टरांना ज्या बालकांना विशेष देखरेखीखाली ठेवायचं असतं, अशा बाळांना नवजात शिशु अतिदक्षता विभागात मध्ये ठेवलं जातं. मध्यरात्री ३.३० च्या सुमारास व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन आग भडकली. सगळा कक्ष या आगीत जळून खाक झाला आहे. दृश्यांमधून या आगीची तीव्रता किती भयंकर होती, ते दिसून येतय. आगीमुळे बाळांचा गुदमरुन मृत्यू झाला.
ज्या व्हेंटिलेटरचा स्फोट झाला, ते कालबाह्य झाले होते का? त्यात काही तांत्रिक समस्या होत्या का? असे अनेक प्रश्न आहेत. ज्या परिसरात हे हॉस्पिटल आहे, तिथपासून फायरब्रिगेडचं ऑफिस किती लांब आहे? आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे बंब किती वेळात पोहोचले? हे सर्व प्रश्न उपस्थित होत आहेत. डीसीपी, अन्य पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. १० दिवस, १५ दिवसाचे कोवळे जीव या ठिकाणी उपचार घेत होते. खरचं काळीज हेलावून टाकणारी ही घटना आहे. याआधी सुद्धा मध्ये आग लागून अनेक बालकांनी आपले प्राण गमावले आहेत.
नवीन इमारत होती
ज्या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आग लागली महत्वाचे म्हणजे ती नवीन इमारत होती. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या रुग्णालयाचं लोकार्पण करण्यात आलं होतं. नव्या इमारतीत अशी दुर्घटना घडणं गंभीर बाब आहे. या दुर्घटनेची चौकशी होणं गरजेचं आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत; फडणवीसांची घोषणा
अमरावतीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा फडणवीस यांनी केली.