TMC उमेदवार स्वप्ना बर्मन यांच्या घराला आग, म्हणाल्या ? "मी राजकारणात येऊन चूक केली..."

Foto
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. अनेक ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना समोर आल्या आहेत. याच दरम्यान, जलपाईगुडीमधील राजगंज विधानसभेच्या तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार आणि सुवर्णपदक विजेती एथलीट स्वप्ना बर्मन यांच्या घराला आग लागल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर स्वप्ना यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "मी राजकारणात येऊन चूक केली, त्यांनी माझं घर जाळलं." ही आग कशी लागली याचा तपास आता केला जात आहे.

जलपाईगुडीच्या पटकाटा ग्रामपंचायतीमधील घोष पाडा येथे स्वप्ना यांची दोन घरं आहेत. स्वप्ना बर्मन आपल्या कुटुंबासह यातील एका घरात राहतात. त्यांच्या जुन्या घराला आग लागल्याची बातमी समोर आली आणि खळबळ उडाली. स्वप्ना यांनी स्वतः आपल्या फेसबुक अकाऊंटवर या संदर्भातील एक पोस्ट शेअर केली. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. बाहेर जोरदार पाऊस पडत असल्यामुळे आग पसरू शकली नाही. घराच्या आतील भागातील आग विझली होती आणि अग्निशामक दलाने तातडीने त्यावर नियंत्रण मिळवलं.

"स्वप्ना यांच्या घरात कोणीही राहत नव्हतं"
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्ना यांच्या त्या घरात कोणीही राहत नव्हतं. एका खोलीत काही जळाऊ लाकडं आणि कागदपत्रं ठेवली होती, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. ही आग नेमकी कशी लागली, याचा तपास केला जात आहे. दुसरीकडे स्वप्ना यांनी फेसबुक पोस्टद्वारे ज्या राजकीय कारस्थानाचा इशारा दिला आहे, त्याची योग्य चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. 

खालच्या पातळीचं राजकारण
काही लोकांचं असंही म्हणणं आहे की, नोकरीतून काढून टाकल्यामुळे आणि आता निवडणूक हरल्यामुळे त्रस्त झालेल्या स्वप्ना सहानुभूती मिळवण्यासाठी असं करत आहेत. या कृत्याला 'नाटक' म्हणत लोकांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे. मात्र स्वप्ना यांच्या समर्थकांनी भाजपावर बोट ठेवत, भाजपा अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.

"आमच्या जुन्या घराला आग लावली"
या प्रकरणाबाबत जलपाईगुडी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमरनाथ यांनी सांगितलं की, "नेमकं काय घडलं, याचा आम्ही तपास करत आहोत." स्वप्ना यांचे मोठे भाऊ असित बर्मन म्हणाले, "आमच्या जुन्या घराला आग लावली गेली आहे." तर जिल्हा तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा महुआ गोप म्हणाल्या, "स्वप्ना यांनी रडत रडत फोन केला आणि त्यांचं घर जाळल्याचे सांगितलं. पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला तिथे जाऊन पाहणी करण्यास सांगितलं आहे. मी स्वतः पोलीस अधीक्षकांनाही याची माहिती दिली आहे. तिथे नेमकं काय घडलं होतं याचा आम्ही शोध घेत आहोत."