छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः पत्नी गरोदर असल्याने तिला अॅडमिट करण्यासाठी अर्ध्या दिवसाची सुटी घेऊन घरी आलेल्या २७ वर्षीय तरूणाला उलट्या झाल्या. त्यानंतर त्रास वाढतच गेला. २६ एप्रिलला पत्नीला बाळंतपणासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले अन त्याला दुसर्या दिवशी. त्यानंतर तो घरी आलाच नाही. दरम्यान त्याला कन्यारत्न झाले. मात्र तब्बल २५ दिवस तो व्हेंटिलेटरवर राहिला अन नवजात बाळाचा चेहरा पाहण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. ही र्हदयद्रावक घटना देवळाई परिसरात घडली. अमेय मंगेश कुलकर्णी (वय २७) रा. देवळाई असे मयत तरूणाचे नाव आहे.
याबाबत नातलगांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेय कुलकर्णी वाळूजला एका सोलार कंपनीत अकाऊंट अधिकारी म्हणून कार्यरत होता. रोज तो वाळूज ते देवळाई असा प्रवास करायचा. पत्नी गरोदर असल्याने २५ एप्रिल रोजी दुपारी त्याने अर्धा दिवसांची सुटी घेतली अन घरी परतला. भर दुपारी वाळूज ते देवळाई असा प्रवास त्याने केला. तापमानाचा पारा ४२ अंशाच्या घरात होता. मात्र पत्नीला बरे नसल्याने अमेयने उन्हाची पर्वा केली नाही. भर उन्हात १० ते १२ किमीचा प्रवास त्याने केला. मात्र घरी आल्यावर त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याने घरगुती उपाय केले. दुसर्या दिवशी म्हणजे २६ एप्रिलला त्याच्या पत्नीला बाळंतपणासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अमेयला बरे नसल्याने तो घरीच होता. त्यानंतर २७ एप्रिलला त्याला ताप आला. ताप वाढल्याने कुटूंबिय घाबरले. त्याला सातारा परिसरातील एका खासगी रूग्णालयात दाखल केले.
म्हणे मेंदूवर सूज...
दरम्यान, ताप वाढल्याने अमेयला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मेंदूवर सूज आल्याचे कुटूंबियांना सांगण्यात आले. तब्बल २० दिवस त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. कुटूंबियांनी इतर रूग्णालयात धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एमआयआर काढण्यात आला. त्यात मेंदूला इजा झाल्याचे निदान करण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. २५ दिवस व्हेंटिलेटरवर राहून अमेयचा मृत्यू झाला.
..मुलीचा चेहरा पाहण्यापुर्वीच
अमेयचे वडील महापालिकेत तर आई जिल्हा परिषद शिक्षिका आहेत. त्यांच्या तीन जुळ्या मुलांपैकी अमेय एक. त्याने एमबीए केले अन वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत नोकरीला लागला. त्यानंतर त्याचे लग्नही झाले. तो आजारी पडला त्याच्या आदल्या दिवशी पत्नीला बाळंतपणासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अमेय व्हेंटिलेटरवर असताना त्याला कन्यारत्न झाले. मात्र तब्बल २५ दिवस तो व्हेंटिलेटरवर होता. अखेर तो यातून बाहेर आलाच नाही. अमेयने नवजात बाळाचा चेहराही पाहिला नाही, असे म्हणत कुटूंबियांनी टाहो फोडला.
वेळीच निदान झाले असते तर...
अमेयच्या मेंदूवर सूज आहे, असे डॉक्टर सांगत होते. मात्र उपचार करताना डॉक्टरांनी एमआयआर केलाच नाही. परिणामी योग्य निदानच झाले नाही, असे कुटूंबियांचे म्हणणे आहे. दोन आठवडे व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर कुटूंबियांच्या आग्रहाखातर एमआयआर काढण्यात आला. तोपर्यंत खूप उशीर झाला होता, असे अमेयच्या आई वडिलांचे म्हणणे आहे.
जीवघेणी उष्णता...
गेल्या दोन आठवड्यांपासून तापमानाचा पारा सलग ४० ते ४२ अंश सेल्सियसच्या घरात आहे. सकाळपासूनच उन्हाचा प्रचंड तडाखा बसत आहे. हवेतील आर्दता कमी झाल्याने उन्हाच्या तीव्र झळा जीवघेण्या ठरत आहेत. उष्णतेच्या या लाटांमुळे दुपारी १२ नंतर घराबाहेर पडणे टाळा असा सल्ला प्रशासन देत आहे. या प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले असून विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे पाणी टंचाई आणी विजेचा लपंडाव शहरवासियांच्या त्रासात भर टाकत आहे. अखेर निसर्गाच्या या प्रकोपाचा पहिला बळी गेला आहे.














