आधी पंचनामे होतील मग शेतकऱ्यांना मिळतील पैसे, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : बावनकुळे

Foto
 नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आणि अनैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपासून वंचित ठेवले जाणार नाही, याची खात्री राज्य सरकारने दिली आहे. कोणताही शेतकरी पंचनाम्यापासून सुटू नये, यासाठी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्यासोबत सातत्याने बैठक घेतल्या जात आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

मंत्री बावनकुळे म्हणाले, मी नुकतीच अमरावती जिल्ह्याला भेट दिली. तिथेही परिस्थिती सारखीच होती. त्यामुळे आम्ही सरसकट पंचनामे करण्याचे आदेश आधीच दिले आहेत. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यांनी स्पष्ट केले की, नेत्यांच्या दौऱ्यात अधिकारी उपस्थित राहण्यापेक्षा फील्डवर सक्रिय राहणे अधिक महत्त्वाचे आहे, कारण तेव्हाच शेतकऱ्यांना खरी मदत पोहोचू शकते.

पंचनामे कधी पूर्ण होणार?

ऑगस्ट महिन्यात सरकारकडे 25 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे प्राप्त झाले होते. सप्टेंबरमध्ये हा आकडा 22 लाख हेक्टर इतका होता. सध्या एकूण 50 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे सरकारकडे उपलब्ध झाले आहेत. बावनकुळे यांनी सांगितले की, आता ऑक्टोबरच्या 4 ते 5 तारखेपर्यंत राज्यातील संपूर्ण नुकसानीचा ताळेबंद स्पष्ट होईल. किती शेतजमीन वाहून गेली, किती जनावरे मृत्यूमुखी पडली, किती घरांची पडझड झाली आणि मानवी जीवितहानी किती झाली, याची संपूर्ण माहिती आमच्याकडे येईल.

नियमांवर बोट न ठेवता मदत

पंचनामे करताना अनेकदा नियमांमुळे अडथळे येतात. मात्र या वेळेस कोणतेही बंधन न ठेवता सरसकट पंचनामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणताही शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही, असे बावनकुळे यांनी जाहीर केले. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पंचनाम्यांनंतर नुकसानभरपाईचे प्रस्ताव तातडीने पुढे पाठवले जातील. यासाठी प्रशासनाला गतीमान कामकाज करण्याचे निर्देश दिले आहेत.असंही बावनकुळे म्हणाले.

शेतकरी संकटात असताना सरकारने सरसकट पंचनाम्यांची घोषणा करून दिलासा दिला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नुकसानीचे संपूर्ण चित्र समोर येणार असून त्यानंतर नुकसानभरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.सरकारने दिलेल्या आश्‍वासनानुसार दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा होणार आहे.