फुलंब्री, (प्रतिनिधी) : बाबरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना शनिवारी (दि. २७) रोजी रात्री झालेल्या जोरदार पाऊसाने अखेर मोठा दिलासा मिळाला आहे.
जोरदार पावसामुळे शेत जमिनींना पुरेसा ओलावा मिळाल्याने बाबरा परिसरातील बोधेगाव, खामगाव, ममनाबाद, लिहा जहागीर, निधोना, सोनारी, वावना परिसरात खरीप पिकांच्या पेरणीला वेग आला असून, शेतात मशागतीची लगबग वाढली आहे. त्याचबरोबर बियाणे, खते आणि औषधांच्या खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी होताना दिसत आहे.
पावसाळासुरु होऊन जवळपास तीन आठवडे उलटले असतांनाही अपेक्षित पाऊस न झाल्याने बाबरा परिसरातील शेतकरी चिंतेत होते. पेरणी करावी की आणखी काही दिवस वाट पाहावी, या संभ्रमामुळे अनेकांनी शेतीची कामे थांबवून ठेवली होती. मात्र, झालेल्या पावसामुळे शेतजमिनींना आवश्यक ओलावा मिळाल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा नव्या उत्साहाने शेतीकडे मोर्चा वळविला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना सुरुवात केली आहे. अनेक
ठिकाणी बैल जोडी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागत सुरू असून, कापूस, तूर अद्रक आणि मका या प्रमुख पिकांच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे.
पावसामुळे शेतकऱ्यांचा कल आता बियाणे, खते आणि पीक संरक्षण औषधांच्या खरेदीकडे वळला आहे. त्यामुळे कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी दिसत असून, ग्रामीण भागातील बाजारपेठेतही खरीप हंगामामुळे चैतन्य निर्माण झाले आहे.












