औरंगाबाद : आत्महत्या हा विषय केवळ शेतकर्यांपुरताच मर्यादित राहिला नसून आता अन्य क्षेत्रातील लोकही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहेत. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच आत्महत्या करत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. जिल्ह्यात मागील अवघ्या दोनच दिवसांत वेगवेगळ्या वयोगटातील पाच व्यक्तींनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्येची कारणे वेगवेगळी असली तरी अवास्तव अपेक्षा, कमी झालेली सहनशीलता आणि मोबाईलचा अतिवापर हे मुख्य तीन घटकच आत्महत्या वाढण्यास कारणीभूत आहेत, असे मानसोपचारतज्ज्ञ संदीप सिसोदिया यांनी म्हटले आहे.
कर्जाचा वाढता डोंगर, दुष्काळ, नापिकी आदी कारणांमुळे मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. अजूनही हे सत्र सुरूच आहे. घरगुती हिंसाचाराच्या त्रासातून मुक्तता व्हावी म्हणून विवाहित महिलाही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. हल्ली अगदी किरकोळ कारणांवरून होत असलेल्या आत्महत्या या चिंतेचा विषय बनला आहे. प्रेमात धोका मिळाल्याने, मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून तर मित्रांनी चिडवले म्हणून काही जणांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवल्याच्या घटना गेल्या काही दिवसात घडल्या आहेत. अशा प्रकारच्या किरकोळ कारणांवरून होणार्या आत्महत्या चिंता वाढवणार्या आहेत.
आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला आपल्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यातच सोशल मीडियावर तासन्तास अॅक्टिव्ह राहिल्याने, मोबाईल गेमच्या आहारी गेल्याने चिडचिड वाढणे, पुरेशी झोप न होणे, एखाद्या गोष्टीत अपयश आले की, लगेच नैराश्य येणे यासारख्या समस्या वाढल्या आहेत. यातूनच मग आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. अपयश पचवण्याची क्षमता आता हरवत चालली असून, पालकांच्या अवास्तव अपेक्षांमुळेही अनेक युवक आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होत आहेत.
मोबाईलचा अतिवापर टाळा
गरज म्हणून मोबाईलचा वापर आवश्यक त्या ठिकाणी करावाच लागतो. मात्र, मोबाईलवर अनावश्यक वेळ घालवणे, तासन्तास सोशल मीडियावर कार्यरत राहणे, मोबाईल गेमच्या आहारी जाणे यासारख्या प्रकारांमुळे मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे. त्यामुळे मोबाईलचा आवश्यक तेवढाच वापर करण्याचा सल्ला मानसोपचरतज्ज्ञ देत आहेत.