बिलोणीत पाच हजारांची लाच : अभियंत्यासह वायरमन अटकेत

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी): बिलोणी येथे घराची वीज जोडणी करून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महावितरणच्या कनिष्ठ अभियंता आणि वायरमनविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. 

दोघांना मंगळवारी अटक केली. शिवूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ दादा बेळे (५०) कनिष्ठ अभियंता व महेश शंकर पाडळे (२६) वायरमन अशी आरोपींची नावे आहेत. तक्रारदारांना त्यांच्या घरासाठी नवीन वीज जोडणी घ्यायची होती. त्यासाठी ते खंडाळा येथील महावितरणच्या कार्यालयात गेले होते. 

तेथे त्यांनी कनिष्ठ अभियंत्याशी संपर्क साधला. यावेळी वीज जोडणीसाठी वायरमनकडे पाच हजार रुपये देण्यास त्यांनी सांगितले. मात्र, तक्रारदारांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ५ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. 

तक्रारीची पडताळणी करण्यासाठी जालना येथील पथकाने चौकशी केली. त्यावेळी वीज जोडणीच्या कामासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. यानंतर मंगळवारी संबंधित वायरमन आणि कनिष्ठ अभियंत्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. 

दोघांना अटक करून पुढील तपासासाठी शिवूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. लाचलुचपत विभागाच्या जालना च्या पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अप्पर पोलीस अधिक्षक शशीकांत सिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे, आतीश तिडके, गजानन खरात, अशोक राऊत, गजानन कांबळे, संदीप लहाने यांच्या पथकाने ही कारवाई केली