पुणे: राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे, अनेक ठिकाणी जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालेलं आहे. अशातच मराठवाड्यावर अस्मानी संकट अधिक गडद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून, चक्रीय स्थितीमुळे राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आहे. विदर्भात 27 सप्टेंबर पर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो, तर काही भागांत आजच अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात 29 सप्टेंबर पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असून, विशेषत: उद्या 27 सप्टेंबर रोजी पावसाची तीव्रता अधिक असण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 25 ते 30 सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर वाढेल, तर 26 ते 30 सप्टेंबरदरम्यान या भागांत मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. दरम्यान, मच्छिमारांना 24 ते 29 सप्टेंबरदरम्यान समुद्रात न जाण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
मराठवाडा आता ढगफुटीप्रवण प्रदेश होत चालला आहे. 2020 नंतरच्या काळात या विभागाला तीन वेळा कमी-अधिक प्रमाणात ओला दुष्काळफ सहन करावा लागला आहे. मागील पाच वर्षांत तब्बल 42 हून अधिक तालुक्यांतील खरीप हंगाम ढगफुटीमुळे उद्ध्वस्त झाला आहे. यंदाही पावसाळ्यात 12 ते 23 सप्टेंबरदरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे 24 लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून, त्यापैकी जवळपास 75 टक्के पंचनामे पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येतो. गेल्या दहा दिवसांत रात्रीच्या वेळी झालेल्या पावसामुळे जीवितहानी आणि पशुधनाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. दरम्यान, हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी एक्स-बॅण्ड डॉप्लर रडार बसविण्याची घोषणा पूर्वीच करण्यात आली होती. मराठवाड्यातील हवामानाचे स्वतंत्र संशोधन आणि विश्लेषण करण्यासाठी यासाठी जागा निश्चितही करण्यात आली होती. मात्र, हा प्रकल्प अजूनही कागदावरच असून त्याला प्रत्यक्षात मुहूर्त मिळालेला नाही.
रात्रीतून पाऊस होण्यामागे डाऊनरफ्ट हे कारण
हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा ढगफुटीचा प्रदेश होतो आहे. 12 सप्टेंबरपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रात्रीतून पाऊस झाला आहे. हिमालयाच्या बाजूला तापमान वाढले आहे. त्यामुळे ढगात पाण्याची धारणक्षमता वाढली आहे. त्याला थंडावा मिळाला, की तेथे ढगफुटीसारखा पाऊस होतो. रात्रीतून पाऊस होण्यामागे डाऊनरफ्ट हे कारण आहे. दिवसा हवेतील आर्द्रता या काळात वाढल्याने बाष्पीभवन वेगाने होऊन डाऊनरफ्ट होऊन ढगफुटीसारखा ढग जमा होतात. व रात्रीतून पाऊस होतो आहे.
मराठवाड्यात पूर का?
बंगालच्या उपसागरात ऑगस्टच्या मध्यापासून सप्टेंबरपर्यंत लागोपाठ कमी दाबाची क्षेत्रे तयार झाली. त्याचा प्रवास पश्चिमेकडे झाला. त्याचा परिणाम म्हणून विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या आजुबाजूच्या परिसरात मोठा पाऊस झाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे तयार झाली की विदर्भासोबत मराठवाड्यात पाऊस होतो.
अतिवृष्टीचे कारण...
14 आणि 15 ऑगस्टनंतर मराठवाड्यातील जिल्ह्यांत सलग पाऊस पडला. याचे कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात एकामागोमाग एक कमी दाबाची क्षेत्रे तयार झाली. ही क्षेत्रे उत्तर पश्चिम व पश्चिम दिशेला सरकली. याचा परिणाम म्हणून विदर्भासोबत मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडला.
ही ढगफुटी नव्हे, एकूणच जोरदार पाऊस झाला
मराठवाड्यात सर्वसाधारण मध्यम पाऊस असतो. मात्र, कमी दाबांच्या क्षेत्रामुळे कमी दिवसांत जास्त पडला. याला ढगफुटी म्हणता येणार नाही. ढगफुटी म्हणजे 1 तासांत 100 मिलिमीटर पाऊस पडतो. मराठवाड्यात गेल्या 45 दिवसांत मोठा पाऊस पडला असून, त्याचा परिणाम म्हणून पूरस्थिती निर्माण झाली आहे. 27, 28 आणि 29 सप्टेंबर रोजीही बंगालमधील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या पावसाला अतिवृष्टी म्हणता येणार नाही किंवा तसे म्हटलेले नाही, असेही होसाळीकर यांनी सांगितले आहे.