मुंबई : राज्यात सध्या मनोज जरांगेंनी केलेल्या 500 कोटीच्या आरोपांवरुन मोठा वादंग सुरु झाला आहे. गेल्या आठवडाभरापसून महाराष्ट्राच्या राजकारणात 500 कोटींचा दावा आणि कथित ऑडिओ क्लिप प्रकरण चांगलंच गाजलं आहे. या ऑडिओ क्लिपवरून दररोज नवनवे दावे प्रतिदावे केले जात असल्यानं राजकारण तापलं आहे. दरम्यान आता याच ऑडिओ क्लिपबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश जारी केला आहे. या आदेशानंतर आता या प्रकरणातील सत्य समोर येण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लीपचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी गठीत करण्याचा आदेश दिलाय. आता पोलिसांचे एक विशेष पथक स्थापन केले जाणार असून जरांगेनी आणलेल्या कथित ऑडिओ क्लीपची चौकशी केली जाणार आहे.
ऑडिओ क्लीपमधील आवाज नेमका कोणाचा आहे?
या ऑडिओ क्लीपमधील आवाज नेमका कोणाचा आहे? हे तपासण्यात येईल. तपासानंतर संबंधित आरोपांमध्ये किती तथ्य आहे हेही समजणार आहे. या तपासणीत या ऑडिओ क्लीपबाबत दूध का दूध, पाणी का पाणी व्हावं अशीच अपेक्षा आहे.
मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लीपमुळे शिवसेना नेतेही आक्रमक
मनोज जरांगे यांच्या व्हायरल ऑडिओ क्लीपवरुन भाजप आणि शिवसेनेत तणाव वाढला आहे. शिवसेनेकडून भाजपवर थेट आरोप केले जात आहेत. तर भाजप नेत्यांकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. या सगळ्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप आणि कुरघोडीचे प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे. मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लीपमुळे शिवसेना नेतेही आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाच्या माध्यमातून त्यांचीही प्रतिमा डॅमेज झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.