पंतप्रधानांच्या पाठोपाठ अमित शाहांनीही घेतली राष्ट्रपतींची भेट

Foto
नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे. या भेटीने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. मंगळवारी २३ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली होती. राष्ट्रपती भवनात झालेल्या या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलासाठी ही भेट असल्याचं बोलले जाते. 

राष्ट्रपती भवनाने सोशल मिडिया एक्स अकाऊंटवर या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. त्यात म्हटलंय की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपर्दी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांनीही अलीकडेच राष्ट्रपतींची भेट घेतली होती. केंद्रात मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुरू आहे. या चर्चांमुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. 

मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा

अलीकडेच केरळचे भाजपा नेते जॉर्ज कुरियन यांचा राज्यसभा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. त्यांच्याकडे अल्पसंख्याक, पशुपालन आणि दुग्ध मंत्रालयाचे राज्यमंत्रिपद होते. पक्षाकडून त्यांना राज्यसभेची पुन्हा उमेदवारी देण्यात आली नाही. २१ जून रोजी त्यांचा कार्यकाळ संपला. त्याशिवाय रेल्वे राज्य मंत्री रवनीत सिंग यांचाही राज्यसभेतील कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा संधी देण्यात आली नाही. त्यात काही केंद्रीय मंत्र्यांना त्यांच्या गृह राज्यात संघटनात्मक जबाबदारी देण्यात आली आहे. ज्यातून संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाच्या चर्चांना बळ मिळत आहे.

टीएमसी-उद्धवसेना खासदार फुटीनंतर समीकरण बदलले

दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रातील सत्तेचे गणित बदलले आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधील २० खासदार NCPI या पक्षात विलीन झाले आहेत. या पक्षाने केंद्रात एनडीए सरकारला पाठिंबा दिला आहे. त्याशिवाय महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील ९ पैकी ६ खासदार फुटले आहे. या खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात या फुटीर खासदारांपैकी काही नेत्यांना मंत्रिपद दिले जाऊ शकते याचीही चर्चा सुरू आहे.