छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : परदेशी विद्यार्थ्यांनी एमजीएम गेटसमोरच तुफान राडा करीत महिलेची छेड काढत तिच्यासह पतीला मारहाण केली. हा प्रकार पाहून जमावानेही त्यांना बेदम चोपले. शुक्रवारी (दि. २७) सकाळी ११ वाजता हा प्रकार घडला, पोलीस आल्यानंतर तरुणांना पकडून घेऊन गेले. मात्र, या प्रकरणात कोणाकडूनही तक्रार न आल्यामुळे सिडको पोलिसांनी त्यांना ताकीद दिली.
सुदान देशातील दोन तरुण एमजीएममध्ये बी. कॉम. चे शिक्षण घेतात. ते दुचाकीने जात असताना समोरून एका दाम्पत्याची कार आली. यात कारच्या आरशाला दुचाकीचा धक्का लागला त्यावरून तरुणांनी अश्लील इशारा केला. हा प्रकार पाहून दाम्पत्याने कार रोखली. तरुणांना याचा जाब विचारला असता, त्यांनी महिलेच्या कानशिलात भडकावली. त्यानंतर महिलेच्या पतीनेही त्यांना मारहाण सुरु केली. तरुणांनी प्रतिकार करीत त्यांना मारहाण केली. यात महिलेच्या पतीच्या कानावर जोरदार फटका लागाला हा राडा पाहून रस्त्यावरील जमावाने दोन्ही परदेशी तरुणांना चोपले. हा प्रकार घडला तेव्हा महापौर समीर राजूरकर हे तेथून जात होते. नागरिकांनी त्यांना थांबवून हा प्रकार सांगितला. त्यानंतर राजूरकर यांनीही त्या परदेशी विद्यार्थ्यांना चांगलेच सुनावले. त्यांच्याशी इंग्रजी भाषेत बोलून गैरकृत्य केल्यास सक्त कारवाईची ताकीद दिली.












