वनसेवा परीक्षेची अधिसूचना जाहीर, २४ फेब्रुवारीपर्यंत करता येतील अर्ज

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) भारतीय वनसेवा (आयएफएस) परीक्षा २०२६ साठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक उमेदवारांना २४ फेब्रुवारी सायंकाळी सहापर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. परीक्षा २४ मे रोजी नागरी सेवा पूर्व परीक्षेद्वारे घेण्यात येणार आहे.
भारतीय वनसेवा परीक्षेसाठी उमेदवारांना नागरी सेवा (पूर्व) परीक्षा देणे आणि ती पात्र ठरणे अनिवार्य आहे. त्यानंतरच उमेदवारांना भारतीय वनसेवा मुख्य परीक्षा (लेखी व मुलाखत) देण्याची संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवार नागरी सेवा परीक्षा आणि भारतीय वनसेवा परीक्षा यासाठी एकाच ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात. उमेदवारांनी अर्ज फक्त संकेतस्थळावरूनच करावा. अर्ज करताना युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन नंबर (यूआरएन), वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, छायाचित्र, फोटो, तसेच स्वाक्षरी अपलोड करणे बंधनकारक आहे. चुकीची माहिती किंवा अपूर्ण कागदपत्रे दिल्यास उमेदवारी रद्द केली जाणार आहे. 
परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना ई-अ‍ॅडमिट कार्ड परीक्षा होण्याच्या आधीच्या आठवड्यात आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. उत्तरपत्रिका ओएमआर पद्धतीची असून चुकीच्या उत्तरांसाठी नकारात्मक गुण देण्यात येणार आहेत. परीक्षेदरम्यान काळ्या बॉलपेनचा वापर अनिवार्य राहील.