बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न : पुन्हा वासरावर हल्ला
वाळूज महानगर, (प्रतिनिधी) : लांझी, हिरापूर, वाळूजवाडी शिवारात गेल्या पंधरवाड्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून मंगळवारी गळवारी (दि.९) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा हिरापूर शिवारातील विलास आदाणे यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला करून फाडशा पाडला.
मागच्या आठवड्यातच त्यांच्याच बकरीच्या कळपातून एक बोकड उचलून नेत ठार मारल्याची घटना घडली होती.
दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी परिसरात पिंजऱ्यासह दाखल होत त्याला जेरबंद करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. वाळूज गावापासून जवळच असलेल्या हिरापूर लांझी व वाळूजवाडी परिसरात बिबट्याने गेल्या महिनाभरापासून मोठा धुमाकूळ घातला आहे.
पंधरा दिवसांपूर्वी वाळूजवाडी येथे राजू राजू राजपूत यांच्या बैलावर हल्ला चढवला होता. मात्र बैलाने दोन हात करत दोरी तोडून पळ काढल्याने तो बालंबाल बचावला होता. मात्र बिबट्याची नखे त्याच्या अंगावर ओरबडली होती. दरम्यान, त्याच ठिकाणाहून बिबट्याने राजपूत यांचा एका पाळीव कुत्र्याला ठार मारले होते. तर त्याच्या दोन तासानंतरच लांजी शिवारात गणेश देवकर यांच्या गट नंबर ७२ मधील शेतात असलेल्या गोठ्यातून एका बकरीला ठार केले होते.
पुन्हा चारच दिवसांनंतर याच परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालून कैलास मुरलीधर आदाने यांच्या शेतवस्तीत असलेल्या सहा फूट उंच लोखंडी जाळीवर उडी मारुन कळपात प्रवेश करुन एका बोकडाला उचलून नेत त्याला ठार केले होते. वन अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर दरम्यान या सर्व घटनांची माहिती त्यांनी घटनास्थळी भेट देऊन रीतसर पंचनामा केला होता मात्र तरीही घटना सतत घडत असल्याने बुधवारी व अधिकाऱ्यांनी पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल होत याच परिसरात पिंजरा बसवण्यात आला आहे.
--शेतकऱ्यांचा रात्रीचा पहारा --
परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने तसेच अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ला करून ठार मारण्याच्या वाढत्या घटनांमुळे परिसरातील शेत वस्तीत राहणाऱ्या शेतकरी व नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. रात्रीच्यावेळी घराबाहेर कोणीही पडायला तयार नाही. तसेच आपापल्या पाळीव प्राण्यांची देखभाल करण्यासाठी गटागटाने शेतकरी रात्रभर लाठ्या काठ्या, टेंभे लावून जागरण करत आहेत.











