नवी दिल्ली : गोध्रा हत्याकांडाला 24 वर्षे पूर्ण झाली असली तरी साबरमती एक्सप्रेसला लागलेल्या आगीवरून आजही देशात राजकारण तापताना दिसत आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी त्यांच्या 'Belonging: A Journey of Love' या पुस्तकात पान क्रमांक 401 ते 403 दरम्यान 2002 मधील गोध्रा ट्रेन अग्निकांड आणि त्यानंतर झालेल्या गुजरात दंगलींवर भाष्य केले आहे. या पुस्तकामध्ये सोनिया गांधींनी ट्रेनमधील आगीचे कारण अजूनही 'विवादित' असल्याचं म्हटलं आहे.
सोनिया गांधींच्या या वक्तव्यावर आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुजरात पोलीस एसआयटीचे (SIT) तत्कालीन प्रमुख आणि माजी आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना यांनी मौन सोडलं आहे. "आगीचे कारण विवादित असल्याचे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. ही आग कोणत्याही अपघाताने नव्हे, तर पूर्वनियोजित कटातून लावण्यात आली होती," असं राकेश अस्थाना यांनी ठामपणे सांगितलं आहे.
ANI ला दिलेल्या मुलाखतीत सीबीआयचे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी तपासाचे सर्व तपशील समोर ठेवले. ते म्हणाले की, हा संपूर्ण खटला फॉरेन्सिक पुरावे, प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी, काही आरोपींचे कबुलीजबाब आणि जळालेल्या डब्याच्या सखोल तपासावर आधारित होता. "सरकारी पक्षाची बाजू केवळ कबुलीजबाबावर अवलंबून नव्हती, तर भक्कम फॉरेन्सिक पुरावे आणि स्वतंत्र साक्षीदारांच्या आधारेच ट्रायल कोर्ट आणि गुजरात हायकोर्टात आरोपींना दोषी ठरवून शिक्षा सुनावली गेली," असेही अस्थाना यांनी स्पष्ट केले.
चेन पुलिंग अन् S-6 डब्यात 140 लिटर पेट्रोल
राकेश अस्थाना यांनी 2002 मधील त्या काळ्या दिवसाचा संपूर्ण घटनाक्रम सांगताना धक्कादायक माहिती दिली. सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी ट्रेन प्लॅटफॉर्मवरून पुढे सरकताच 3 ते 4 डब्यांतून एकाच वेळी चेन पुलिंग करण्यात आली. ट्रेन पुन्हा सुरू झाल्यावर अर्धा किलोमीटर अंतरावर व्हॅक्यूम की फिरवून 4 डब्यांची चेन पुलिंग करून ट्रेन 'सिग्नल फलिया' परिसरात थांबवण्यात आली. ट्रेन जिथे थांबली तिथे आधीच 150 ते 200 लोकांचा जमाव उभा होता आणि त्यातील 20 ते 25 तरुणांनी पेट्रोल जमा करून ठेवले होते.
हल्लेखोरांनी S-6 आणि S-7 डब्यांमधील कॅनव्हासचे वेस्टिब्यूल कापले. प्रवाशांनी दगडफेकीमुळे दरवाजा आतून बंद केला होता, मात्र काहींनी दरवाजा ढकलून आत प्रवेश केला आणि तब्बल 140 लिटर पेट्रोल डब्यात ओतून बाहेर उडी मारली. बाहेर उभ्या असलेल्या जमावाने दगडफेकीत फुटलेल्या खिडक्यांमधून आत पेटत्या मशाली फेकल्या. अवघ्या 5 मिनिटांत संपूर्ण S-6 डबा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या भीषण घटनेत 27 महिला, 10 मुले आणि 22 पुरुष अशा एकूण 59 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.
'हा अपघात नव्हता'
सोनिया गांधींचे दावे निराधार ठरवत राकेश अस्थाना पुढे म्हणाले की, जे प्रवासी जीव वाचवण्यासाठी डब्यातून बाहेर उड्या मारत होते, त्यांनाही जमावाने पाठलाग करून मारहाण केली. सकाळीच जमाव गोळा होणे, पेट्रोल साठवणे आणि 'अमन गेस्ट हाऊस'मध्ये बैठक घेऊन नियोजन करणे, हा अपघात कसा असू शकतो? या गेस्ट हाऊसचा मालक रज्जाक कुरकुर हा देखील मुख्य सूत्रधारांपैकी एक होता, असे त्यांनी नमूद केले.
सोनिया गांधींच्या पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?
सोनिया गांधी यांनी आपल्या पुस्तकाच्या पान क्रमांक 403 वर लिहिलं आहे की, अयोध्येतून अहमदाबादला परतणाऱ्या साबरमती एक्सप्रेसच्या डब्यांना आग लावल्यानंतर 2002 च्या दंगली भडकल्या होत्या, ज्यात राम मंदिराच्या स्वयंसेवकांसह 59 यात्रेकरूंचा मृत्यू झाला. या आगीची कारणे आजही विवादित आहेत, मात्र या घटनेनंतर संपूर्ण राज्यात हिंसाचार पसरला ज्याचे मुख्य बळी मुस्लिम ठरले, असे सोनिया गांधींनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे.