फेसबुक पोस्टच्या वादातून माजी नगरसेवकाची धमकी

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : फेसबुकवर टाकलेल्या एका पोस्टवरून झालेल्या वादातून सामाजिक कार्यकर्त्याला माजी नगरसेवकाने फोनवर अश्लील शिवीगाळ करत गोळ्या घालून मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवारी (दि.२२) रात्री साडेदहाच्या सुमारास बंबाटनगर भागात घडली. गजानन मनगटे असे माजी नगरसेवकाचे नाव आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
ज्ञानेश्वर गायकवाड (४६, रा. बंबाटनगर, बीड बायपास रोड) हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करतात. नुकतीच महापालिका निवडणूक संपल्यानंतर वाद शांत व्हावे म्हणून त्यांनी गुरुवारी त्यांच्या ज्ञानेश्वर पाटील गायकवाड या फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यांनी इलेक्शन जपा रिलेशन असा मजकूर आणि त्यात गायकवाड आणि जंजाळ पाटील यांचा फोटो होता. 
या पोस्टवर आरोपी गजानन मनगटे (रा. न्याय नगर, गारखेडा परिसर) याने वाद घातला. पोस्टवर अश्लील, शिवीगाळ करणार्‍या कमेंट केल्या. त्यामुळे गायकवाड यांनी मनगटे यांना रात्री साडेदहाच्या सुमारास कॉल करून अश्लील कमेंट करू नका असे सांगितले. त्यावर मनगटे यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तू २०२४ ला भाजप पक्षाचे काम केलेस, माझ्या नादी लागू नकोस, माझ्या चार कंपन्या आहेत. तुला १०० टक्के मारणार, तसेच तुला गोळ्या घालून मारून टाकेन, घरात घुसून तलवारीने ठार मारून टाकीन, असे म्हणत आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आरोपी गजानन मनगटे विरुद्ध बीएनएस कलम ३५१(३), ३५२ आणि ३५६(१) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.