ढाका : बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात मानवता विरोधी आरोपांवर सर्वात मोठा निकाल हाती आला आहे. शेख हसीना यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज कोर्टाने निकाल दिला. बांग्लादेशमध्ये झालेल्या हिंसेप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आलं असून कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
शेख हसीना यांच्यावर एकूण 5 वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे आणि हत्या प्रकरणाचे आरोप आहेत. तीन सदस्यांच्या समितीनं एकमताने या निर्णयासाठी सहमती दर्शवली आणि कोर्टानं अंतिम निकाल दिला. हा निकाल 453 पानांचा आहे. हे प्रकरण सर्वात मोठं असून 6 टप्प्यात या प्रकरणाचा निकाल देण्यात आला. बांगलादेशच्या राजकीय इतिहासातील हा न्यायालयाचा निर्णय अभूतपूर्व मानला जात आहे.
देशाचे पंतप्रधान आणि त्यातही असा गंभीर गुन्हा करणाऱ्या नेत्याविरोधात इतका मोठा निकाल देण्याची ही पहिलीच वेळ आहे. बाकी सर्व आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी वकिलाने न्यायालयाकडे केली आहे. या घटनेनंतर बांगलादेशमध्ये राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
शेख हसीना यांनी सरकार टिकून राहण्यासाठी आंदोलनकर्त्यांवर हल्ला घडवून आणला. या हिंसाचारादरम्यान 1400 नागरिकांचा मृत्यू झाल्याचं UN च्या मानवाधिकार तपासकर्त्यांचं म्हणणं होतं. देश सोडण्यापूर्वी त्यांनी आंदोलन करणाऱ्यांवर गोळीबार करण्याचे आदेशही दिले होते असा आरोप त्यांच्यावर आहे. हसीना यांनी यापूर्वी त्यांच्यावर केलेले आरोप नाकारले होते. इतकंच नाही तर शांतते आंदोलन करणाऱ्यांवर हेलिकॉप्टरने बॉम्ब टाकण्याचे आदेश दिले होते. हा सुनियोजित हल्ला होता हे कोर्टात सिद्ध झाल्यानंतर आता कोर्टानं त्यांना फाशीची शिक्षा दिली आहे.
शेख हसीना यांचा समर्थकांना भावनिक ऑडिओ संदेश
दरम्यान न्यायालयाच्या निर्णयाच्या काही तास आधी, शेख हसीना यांनी अवामी लीगच्या फेसबुक पेजवर एक भावनिक ऑडिओ संदेश प्रसिद्ध केला. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या समर्थकांना एकजुटीचा संदेश देत म्हटले, "घाबरण्याचे काहीही नाही. मी जिवंत आहे, मी जिवंत राहीन... मी देशातील लोकांसोबत उभी राहीन." त्यांनी अवामी लीगच्या मागील रॅलींसाठी समर्थकांचे कौतुक केले आणि त्यांना सध्याच्या अंतरिम सरकारचा सामना करण्यास प्रोत्साहित केले.