जालना, (प्रतिनिधी ): : परतूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश कुमार कन्हैयालाल जेथलिया यांचे काल एक मे रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यांने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली.
दरम्यान माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांना काळाने हिसकावले, ते सर्वांचे अजात शत्रू होते, या शब्दात माजी मंत्री तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी श्रद्धांजली वाहिली तर खासदार कल्याणराव काळे यांनी, त्यांची जुनी आठवण आवर्जून सांगितली. या प्रसंगी चंद्रकांत खैरे, आमदार प्रतापराव चिखलीकर, आमदार बबनराव लोणीकर, चंद्रकांत दानवे, आ. मनोज कायंदे, खासदार संजय जाधव, माहेश्वरी समाजाचे प्रदेशाध्यक्ष गांधी यांनी श्रद्धांजलीपर भाषणे केली. यावेळी माजी आमदार कैलास गोरंट्याल, गणेशराव दुधगावकर, आ. हिकमत उडान, परभणीचे आमदार राहुल पाटील , पाथरीचे आमदार राजेश विटेकर, माजी आमदार अरविंद चव्हाण, महापौर वंदना मगरे, तथा उपमहापौर राजेश राऊत , भास्कर आंबेकर, पंडित भुतेकर, हरिहर शिंदे, डॉ. संजय राख, आमदार राजेश भैय्या राठोड, दैनिक सांजवार्ताचे संपादक दिलीप चितलांगे यांच्यासह जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजकीय कारकीर्द
माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी विधान परिषदेचे सहा वर्षे तर विधानसभेची पाच वर्षे या मतदारसंघातून नेतृत्व केले आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांनी विधानसभेचे काँग्रेसने तिकीट नाकारल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटात प्रवेश केला. माजी आमदार सुरेश कुमार घेतल्या यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात परतुर विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामे केली याबरोबरच परतूर नगरपालिकेवर जवळपास ३५ वर्षे त्यांची निर्विवाद सत्ता राहिली या माध्यमातून त्यांनी शहरात रस्ते शुद्ध पाणीपुरवठा योजना घनकचरा प्रकल्प सह विविध विकासकामे करून शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले होते.
भाजप नेते आमदार बबनराव लोणीकर यांना तुल्यबळ लढत देणारे नेते म्हणूनही माजी आमदार जेथलिया यांच्याकडे पाहिले जात होते. सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य करून मतदारसंघात एक वेगळी ओळख निर्माण केली होती यांचा मनमिळाऊ स्वभाव व सर्वांना सोबत घेऊन चालण्याची हातोटी परिस्थिती होती. एकूणच त्यांच्या अकाली निधनाने मतदारसंघातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या पश्चात पत्नी माजी नगराध्यक्ष विमलताई जेथलिया, मुले युवा नेते नितीन, जेथलिया प्रवीण जेथलिया सह भाऊ बहिणी सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.