छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः पेट्रोल पंपाची जागा डेव्हलप करण्याचे सांगत वृद्धेची चाळीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आली. याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिर्झा यास्मिन बेगम मिर्झा बिस्मिल्ला बेग, बिस्मिल्ला बेग कय्यूम बेग राहणार डीलक्स अपार्टमेंट व अजमत बेग कयूम बेग रा.बारापूरला गेट मिलकॉर्नर अशी आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणी जकिया बेगम अब्दुल्ला खान (वय 67) रा. कोहिनूर कॉलनी पानचक्की रोड यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार आरोपींनी पेट्रोल पंपाची जागा डेव्हलप करून इन्स्टॉल करण्यासाठी 40 ते 50 लाख रुपयांची आवश्यकता आहे असे फिर्यादींना सांगितले. पेट्रोल पंप तयार झाल्यानंतर तुमची रक्कम दोन महिन्यात परत करू त्यावर तुम्हाला थोडी जास्त रक्कम देऊ असे आमिष दाखविले. त्यानुसार फिर्यादी यांनी बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक शाखा सिटीचौक येथील बँक खात्यातून नोव्हेंबर 2023 मध्ये 15 लाख रुपये मिर्झा यास्मिन बेगम बिस्मिल्ला बेग यांच्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यात आरटीजीएसद्वारे वर्ग केले. तसेच फिर्यादींच्या दोन्ही मुलींच्या बॉम्बे मरकंटाईल बँक शाखा सिटी चौक येथील बँक खात्यातून 9 नोव्हेंबर 2023 व 10 नोव्हेंबर 2023 रोजी 25 लाख रुपये दिले. मात्र पेट्रोल पंप चालू झाल्यानंतरही आरोपींनी पैसे परत न करता विश्वासघात करून फसवणूक केली. या पकरणी सिटी चौक पोलीस पुढील तपास करीत आहेत.
लॅपटॉपसह रोख रक्कम लंपास
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः गॅलरीचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करीत चोरट्यांनी कपाटातील रोख रक्कम आणि लॅपटॉप लंपास केल्याची घटना सिडको महानगर 1 वाळूज परिसरात घडली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा पुरुषोत्तम पवार रा. तिरुपती रेसिडेन्सी सिडको महानगर 1 यांनी फिर्याद दिली. चोरट्यांनी घराच्या गॅलरीचा दरवाजा तोडून प्रवेश केला. कपाटात ठेवले 13 हजार रुपये रोख व डेल कंपनीचा लॅपटॉप चोरून नेला. वाळुज एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
पाच लाखांचे ईलेक्ट्रिक वायर लंपास
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः बांधकाम साईटवरील स्टोरेज रूमचे लॉक तोडून वॉचमन व सुरक्षा गार्ड यांनी 4 लाख 92 हजार 340 रुपयांचे ईलेक्ट्रीक वायर बंडल लंपास केल्याची घटना गोलवाडी परिसरात घडली. या प्रकरणी आरोपींवर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश राठोड व अभय डोके रा. छत्रपती संभाजीनगर अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी अनुप कुमार प्रकाशराव वराडे रा. रामकृष्ण नगर कासलीवाल नगर गारखेडा परिसर यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार 21 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास आरोपींनी फिर्यादींच्या बांधकाम साईटवरील स्टोरेज रूमचे लॉक तोडून रूम मध्ये ठेवलेले 4 लाख 92 हजार 340 रुपयांचे इलेक्ट्रिक वायर बंडल लंपास केले. सातारा पोलीस पुढील तपास करीत आहेत.