अॅनलॉक 1 मध्ये महिनाभरात औरंगाबाद शहरात मुंबई, पुणे, ठाणे पाठोपाठ सर्वात जास्त कोरोना बाधित आढळून आले आहेत. लॉकडाऊनचे नियम शिथिल होताच नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडले आणि कोरोनाने त्यांच्यावर धुंवाधार बरसात केली, असे एकंदर चित्र आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या अनलॉक 2 मध्ये जिल्हा प्रशासनाने अधिक काळजी घेत कडक धोरण आखले आहे. विनाकारण आणि विनामास्क फिरणार्यांवर मोठ्या प्रमाणावर प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने कारवाई सुरू करण्यात आली आहे.
शहरात 7 मार्च दरम्यान पहिला कोरोनाचा रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर संख्या वाढत गेली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. यावेळी सर्व मार्केट बंद करण्यात आले होते. बससेवा, रेल्वे सेवा बंद होती. इतकेच नव्हे तर कडक यंत्रणा देखील सज्ज झाली होती. 7 मार्च ते 1 जून पर्यत कोरोनाचा अहवालानुसार 1 हजार 587 रुग्ण आढळून आले. त्यापैकी 1 हजार 49 रुग्ण बरे देखील झाले होते. त्यामुळे दिलासा मिळाला. परंतु 1 जूनच्या नंतर लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. यामुळे बाजारपेठ, कंपन्या सह आदी सुरू झाले. पी-1 आणि पी-2 या फॉर्म्युला नुसार बाजारपेठ उघडण्यात आली. सर्व नियमांचे पालन देखील करण्यात आले. असे असताना देखील याच काळात सर्वाधिक रुग्णसंख्या वाढली असल्याचे समोर आले. 1 जुननंतर आजपर्यंत 4401 ने रुग्णांची संख्या वाढली. त्यामुळे जिल्ह्यातील आजपर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5988 वर जाऊन पोहचली आहे.
काळजी घ्यावी लागेल
लॉकडाऊन च्या काळात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या केवळ 1587 होती. तर आज ती अनलॉक केल्यानंतर 5 हजार 988 वर जाऊन पोहचली आहे. यामुळे चिंता आणखी वाढली आहे. अनलॉक काळात सर्वाधिक म्हणजे 4401 ने रुग्णसंख्या वाढली आहे. या आकडेवारी नुसार नागरिकांनी पाहिजे तेवढी काळजी घेतलेली दिसत नाही. नागरिकांनी आता आणखी काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाचे लक्षणे आढळून आल्यास घाबरून न जाता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. मात्र अजूनही काहीजण याकडे गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येते. एक वस्तू घेण्यासाठी प्रतिदिन बाजारात नागरिक गर्दी करताना दिसून येतात. त्यात काहीजण अजूनही बिना मास्कचेच फिरताना दिसतात यामुळे चिंता आणखी वाढत चालली आहे. नागरिकांनी स्वतः ची काळजी स्वतः घ्यायला हवे. काहिजण गरज नसताना देखील प्रतिदिन मार्केटमध्ये फिरताना दिसतात. आठ दिवसांच्या जीवनावश्यक वस्तू एकाच दिवशी खरेदी केल्या तर मार्केटमधील गर्दी कमी होऊ शकते.
मृत्यूचे तांडव
कोरोनामुळे औरंगाबाद जिल्ह्यात 1 जूनपर्यंत 78 रुग्णांचा मृत्यू झाला. तर त्यानंतर त्यात 193 ने भर पडली त्यामुळे आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा अहवाल पाहिला तर 271 रुग्णांचा जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याची कारणे पाहिली तर अनेकजण रुग्णलयात उशिरा उपचार घेण्यासाठी पोहचले तर अनेकांचा कोरोनाचा अहवाल मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आला. त्यात कोव्हीड-19 आणि मधुमेह, ऑक्सिजनचे प्रमाण कमी असणे, निमोनिया यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात 271 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
महिनाभरा 4401 रुग्ण
1 जून नंतर आजपर्यंत एका महिन्यात जवळपास 4401 ने रुग्णसंख्या वाढली आहे. जी रुग्णसंख्या 1 जुनपूर्वी केवळ 1587 वर होती. तर त्यानंतर आजपर्यंत हीच संख्या 5988 वर जाऊन पोहचली आहे. प्रतिदिन रुग्णसंख्या ही शंभरहुन अधिक येत आहे. यावर आता विचार करावा लागेल. लॉकडाऊन शिथिल करून एक महिना उलटला आहे. याच काळात सर्वाधिक रुग्णसंख्या वाढली असल्याचे कोरोनाच्या अहवालानुसार चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. त्यापैकी 2 हजार 857 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.











