वैजापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील बाभुळगाव गंगा येथे गोदावरी नदीपात्रात शेतकऱ्यांवर गोळीबार करून फरार झालेल्या वाळूतस्करांच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली आहेत. फरार आरोपींमध्ये श्रीरामपूर नगर परिषदेचा अपक्ष नगरसेवक पैलवान अर्जुन दाभाडे याचाही समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस व महसूल प्रशासनाने ही घटना गांभीर्याने घेतल्याचे दिसत आहे. श्रीरामपूर व वैजापूर तालुक्यांच्या हद्दीतून गोदावरी नदी वाहते. श्रीरामपुरातील नाऊर, नायगाव व वैजापूर तालुक्यातील बाभूळगावगंगा येथील हद्दीमध्ये रविवारी रात्री वाळूतस्करांनी शेतकऱ्यांवर हल्ला केला होता. यात बाभूळगावगंगा येथील जालिंदर सोपान कुंजीर (४५) व विजय कुंजीर यांना बेदम मारहाण करून गोळीबार करण्यात आला होता.
नदीपात्रामध्ये शेतकऱ्यांवर दोन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या प्रकरणी श्रीरामपुरातील नगरसेवक दाभाडे याच्यासह उद्देश मंडलिक, महेश गायकवाड, विकास ऊर्फ विकी ढमके, राहुल चव्हाण, विजय हटांगळे, मंगेश साबळे, विजय पवार, राहुल थोरात (रा. सर्व गोंधवणी, श्रीरामपूर) यांच्यावर वीरगाव (ता. वैजापूर) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर सर्व वाळूतस्कर वाहनातून तेथून पसार झाले होते.
तत्पूर्वी त्यांनी पोलिसांना माहिती पुरवत असल्याचा आरोप करत जालिंदर कुंजीर यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. गोदावरी नदीपात्रात काही महिन्यांपूर्वी तरुणाचा खून झाला होता. त्या गुन्ह्यात दाभाडे हा आरोपी आहे. दाभाडे याच्यावर श्रीरामपूर तालुक्यात १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. फरार वाळूतस्करांचा छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके, वीरगाव व वैजापूर पोलीस ठाण्याचे प्रत्येकी एक अशी चार पथके शोध घेत आहेत. नाशिक व अहिल्यानगर येथे त्यांचा शोध सुरू आहे.













