छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत कायम असून, शनिवारी (दि. २८) चारवर्षीय चिमुकलीवर चार कुत्र्यांनी हल्ला करत ओढून नेत तिचे लचके तोडले. ही खळबळजनक घटना पहाटे नारेगाव परिसरात घडली. गंभीर जखमी अवस्थेत चिमुकलीला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रमजानचा महिना असल्याने नारेगावातील शेख मुस्तफा यांचे कुटुंब सहेरीसाठी पहाटेच जागे झाले. कुटुंबातील आयशा सय्यद ही चिमुकली घरासमोरील ओट्यावर येऊन उभी राहिली. तेवढ्यात चार ते पाच कुत्र्यांच्या टोळक्यांनी या चिमुकलीला फटफटत नेले. तिच्या संपूर्ण शरीरावर चावा घेत लचके तोडले. चिमुकलीच्या ओरडण्याचा, रडण्याच्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी धाव घेत कुत्र्यांच्या तावडीतून तिची सुटका केली. त्यानंतर गंभीर जखमी चिमुकलीला तातडीने उपचारासाठी घाटी रुग्णालयात नेण्यात आले. तिच्या संपूर्ण शरिरावर जखमा असल्याचे उपचार करणार्या डॉक्टरांनी सांगितले. यावेळी नगरसेवक काकासाहेब काकडे, मतीन पटेल हेदेखील घटनास्थळी दाखल झाले होते. विरोधी पक्षनेता समीर बिल्डर यांनी महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाचे डॉ. शाहेद शेख यांना माहिती दिली. त्यांनी तातडीने कुत्रे पकडण्याची मोहीम राबविली. त्यात चार मोकाट कुत्रे पकडण्यात आल्याचे शेख शाहेद यांनी सांगितले.













