छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : प्रा. राजाभाऊ लोंढे खून प्रकरणातील चौथ्या साथीदाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून लोंढे यांचा मोबाइलही जप्त करण्यात आला आहे. अक्षय बाळकृष्ण शेटे (२४, रा. चितेगाव, ता. पैठण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मुख्य आरोपी विशाल राठोड याने लोंढे यांचा मोबाइल शेटेकडे देत पुण्यात जाऊन स्टेटस अपडेट करण्यास व नंतर मोबाइल फेकून देण्याचे सांगितल्याचे तपासात समोर आले आहे. लोंढे यांचा मोबाइल पुण्यात नेऊन त्यावर व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवत दिशाभूल करण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा आरोपींचा प्रयत्न गुन्हे शाखेने उधळून लावला.
यापूर्वी अटक करण्यात आलेले विशाल राठोड व करण आढे यांना २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे तर आरोपी आकाश पवार याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, राठोडच्या घरझडतीत पोलिसांनी अॅपल कंपनीचा लॅपटॉप, आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे आणि गुन्ह्यात वापरलेली क्रेटा कार (एमएच ४६, बीए ६५९८) जप्त केली. तसेच मृतदेह पुरण्यासाठी वापरलेले दोन फावडे करण आढे याच्याकडून हस्तगत करण्यात आले.
मृताचे भाऊ उत्तम लोंढे (रा. सौंदरे, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांच्या फिर्यादीनुसार ५ फेब्रुवारी रोजी राठोड याने लोंढे यांना दौलताबाद येथील फार्महाऊसवर नेले. त्यानंतर ते परतले नाहीत, असे नमूद केले होते.
पुण्यात घेऊन जाणार
तपासात आर्थिक व्यवहारातील वादातून राठोडने गोळी झाडून हत्या केल्याचे समोर आले. तर गेवराई तांडा परिसरात मृतदेह पुरल्याची बाब उघड झाली आहे. पोलीस आता अक्षय शेटेला सोबत घेऊन पुण्यात जाऊन मोबाइलचा मागोवा घेणार आहेत. तांत्रिक पुरावे, आर्थिक व्यवहार आणि आरोपींच्या नेटवर्कचा तपास सुरू आहे.












