मोबाईल हॅक करून १ कोटीची फसवणूक

Foto
रक्कम गोठवण्यात सायबर पोलिसांना यश
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): 'आरटीओ चालान'च्या नावाने फ्रॉड एपीके फाईल पाठवून एका कंपनीच्या मालकाचा मोबाईल हॅक करून १ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. मात्र, सायबर पोलिसांनी संपूर्ण रक्कम बँक खात्यात गोठवल्याची माहिती सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी बुधवारी (दि.५) दिली.
'एनव्हे बायोटेक प्रा. लि.' या कंपनीच्या मालकाच्या व्हॉट्सअॅपवर ४ ऑगस्ट रोजी एका अज्ञात नंबरवरून 'आरटीओ चालान' या नावाची एक एपीके फाईल आली होती. ही फाईल उघडल्यामुळे त्यांचा मोबाईल फोन सायबर गुन्हेगारांकडून हॅक झाला. त्यानंतर गुन्हेगाराने मालकाच्याच व्हॉट्सअॅपचा वापर करून कंपनीतील अकाऊंटंटला मेसेज केला व एका अज्ञात इंडसलँन्ड बँकेच्या खात्यावर तात्काळ १ कोटी रुपये पाठवण्याचे निर्दे श दिले. स्वतः मालकानेच मेसेज केला असल्याचा विश्वास वाटल्याने अकाऊंटंटने तात्काळ आरटीजीएस द्वारे १ कोटी रुपये नमूद बँक खात्यावर ट्रान्सफर
केले होते. थोड्याच वेळात त्याच व्हॉट्सअॅप नंबरवरून पुन्हा ४ कोटी रुपये पाठवण्यासाठी मेसेज आला. एवढी मोठी रक्कम पुन्हा मागितल्याने अकाऊंटंटला संशय आला. त्याने तात्काळ कंपनीच्या मालकाला थेट कॉल करून खात्री केली तेव्हा मालकाचा फोन हॅक झाल्याचे समोर आले. अकाऊंटंटने तत्काळ थेट सायबर पोलीस स्टेशन गाठले.
गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त शशिकांत सातव, सहाय्यक पोलिस आयुक्त मजहर सय्यद, सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक कदीर देशमुख, उपनिरीक्षक गणेश गिरी, पोलिस अंमलदार सुशांत शेळके, योगेश तळवंदे, सचिन संपकाळ, सोनाली वडनेरे, वैभव वाघचौरे, गोकुळ कुतरबाडे, राम काकडे, संदीप पाटील, माला सलामपुरे आदींच्या पथकाने तांत्रिक तपास करुन सायबर भामट्यांनी लांबविलेली रक्कम बँक खात्यात गोठवून सायबर गुन्हेगारांचा डाव उधळून लावला असल्याचे पोलिस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions