भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, दुसऱ्या प्रकरणात पुन्हा उद्या न्यायालयात हजर करणार ....

Foto
नाशिक : अशोक खरातची पोलीस कोठडी संपल्याने आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले  होते . सध्या एसआयटीकडून अशोक खरातची चौकशी सुरु आहे. या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर आली. अशोक खरातविरोधात नवनव्या तक्रारी दाखल होत आहेत. अशोक खरातने केलेलं लैंगिक शोषण, अनेकांना घातलेला आर्थिक गंडा आणि इतर अनेक कारनाम्यांची जंत्री वाढतच चालली आहे. त्यामुळे अशोक खरातची कोठडी वाढवण्याची मागणी एसआयटीकडून करण्यात आली. अशोक खरातवर दाखल असणाऱ्या अत्याचाराच्या पहिल्या गुन्ह्यात याधी तीनवेळा त्याला पोलीस कोठडी सूनवण्यात आली होती.

दरम्यान नाशिकमध्ये अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड झाली असून, पहिल्या महिलेच्या लैंगिक शोषण प्रकरणात आज न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी या गुन्ह्यात 14 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. दरम्यान, दुसऱ्या गुन्ह्यांची सुनावणी उद्या होणार असून त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. आणखी 8 महिलांकडूनही लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल झाले आहेत.
 
एसआयटीकडून अशोक खरातची काल पुण्याचा सीए, ईशान्येश्‍वर मंदिराचा पुजारी आणि एका सराफाला समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. एसआयटीनं चौघांची सहा तास चौकशी केल्याची सूत्रांची माहिती आहे. या चौकशीतून खडे, रत्न सोन्याच्या बदल्यात अशोक खरात बनवाबनवी करत असल्याची माहिती समोर आली. तसेच पुण्यातील एका बँकेमधून घेतलेल्या कर्जप्रकरणाचीही माहिती चौकशी केल्याची सूत्रांची  माहिती आहे. एका बँकेचा मॅनेजर आणि इतरांना मिळून अशोक खरातने एक कोटी रुपयांची लाच दिल्याचा एसआयटीला संशय आहे. त्याचप्रमाणे वाढलेल्या सोन्यच्या किंमतीत खरेदी-विक्रीमध्ये लाखोंचा नफा मिळवल्याची माहिती देखील समोर आली आहे. 

खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातला रात्री चौकशी करून सोडलं
अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात याला काल सायंकाळी सुमारे 7.30 वाजता  च्या पथकाने घरातून ताब्यात घेत चौकशीसाठी नेले होते. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या चौकशीनंतर त्याला सोडण्यात आले. दरम्यान, अशोक खरात आणि हर्षवर्धन यांची एकत्रित चौकशीही करण्यात आली. मालमत्तेशी संबंधित मुद्द्यांवरून पिता-पुत्राच्या चौकशीतून तपासाला महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आयकर विभागाकडून अशोक खरातवर मोठी कारवाई होण्याची शक्यता
नाशिकमध्ये अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून, केवळ बारा लाखांचे उत्पन्न दाखवत आयकर भरला जात असताना त्याची प्रत्यक्ष संपत्ती मात्र शेकडो कोटींच्या घरात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याशिवाय विविध कंपन्या, बांधकाम प्रकल्प आणि हार्डवेअर व्यवसायाच्या माध्यमातून जीएसटी बुडवण्यात आल्याचीही शक्यता आयकर विभागाने व्यक्त केली आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर अशोक खरातवर लवकरच आयकर विभागाकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.