सिल्लोड, (प्रतिनिधी) अजिंठा (ता. सिल्लोड) येथे नॅशनल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेजच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उदंड प्रतिसाद मिळाला.
नॅशनल हॉस्पिटलच्या वतीने तालुक्यातील विविध गावात आरोग्य विषयी जनजागृती करून मोफत तपासणी करण्यात येते.
अजिंठा येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन शिवसेना उपजिल्हाप्रमुख देविदास पा. लोखंडे यांच्याहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी सरपंच नजीर अहेमद, सय्यद नासेर हुसेन, दुर्गाबाई पवार, तारेख चाउस, सलमान पठाण, राजेश माहोर तसेच डॉ. मच्छिंद्र पाखरे, डॉ. अहेमद शरीफ, डॉ. खंदारे, डॉ. देशमुख आदींची प्रमुख प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरात रुग्णांना तपासणी अंती तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेवून त्यांना आवश्यक उपचार किंवा शस्त्रक्रिया साठी नॅशनल हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार करण्यात येते. नॅशनल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल सिल्लोड येथे तज्ञ डॉक्टर्स अद्यावत यंत्रसामुग्री आणि विविध शासकीय योजना उपलब्ध असल्याने पंचक्रोशीतील रुग्णांना व गरजूंना याचा लाभ मिळत आहे.
या शिवाय रुग्णांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना, या व्यतिरिक्त जननी शिशु सुरक्षा आणि राष्ट्रीय बाल आरोग्य योजना यासारख्या योजनांची माहिती शिबिरात देण्यात येते.
निरोगी राज्ये, प्रगतीशील भारत ही भूमिका समोर ठेवून नॅशनल हॉस्पिटलच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. नॅशनल हॉस्पिटलच्या वतीने तालुक्यातील विविध गावांत नियमितपणे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात येत आहे याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नॅशनल हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.
















