पैठण, (प्रतिनिधी) : मातोश्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, आडूळ यांच्या वतीने आडूळच्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या आरोग्याविषयी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना लहान वयातच आरोग्यविषयक समस्यांची जाणीव व्हावी तसेच आजारांचे वेळीच निदान होण्यास मदत व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या शिबिरात विद्यार्थिनींना मासिक पाळी बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याप्रती जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या सामाजिक बांधिलकीतून मातोश्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलने हा उपक्रम राबविला. या शिबिरासाठी डॉ. महेश लंगोटे आणि डॉ. दिपक वाघ यांनी पुढाकार घेतला.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तसेच डॉ. साई, डॉ. निखिल, डॉ. पूजा, डॉ. नागरे यांची उपस्थिती होती. मातोश्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, आडूळ यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.












