मुंबई : देशाच्या लोकशाहीसाठी घातक असणार्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरद पवार) घेतला असेल तर यापुढे त्यांना फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेण्याचा अजिबात अधिकार नाही. मोदी-शाहांचे हात बळकट करणे हा महाराष्ट्रद्रोह आहे. लोकशाहीचा गळा आवळणार्या विधेयकाला जर शरद पवार पाठिंबा देणार असतील तर आम्ही शांत बसणार नाही, अशा संतप्त भावना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केल्या. एरवी शरद पवार यांचे कौतुक संजय राऊत यावेळी मात्र शरद पवार आणि त्यांच्या पक्षावर तोंडसुख घेताना दिसले.
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिल्यानंतर महाराष्ट्रात भूकंप झाला आहे. शरद पवार यांच्या पक्षाच्या भूमिकेमुळे शिवसेना आणि काँग्रेस संतप्त झाली आहे. राष्ट्रवादीकडे केवळ १० आमदार होते, असे असताना आम्ही आमच्या मतांच्या जोरावर शरद पवार यांना खासदार करून राज्यसभेत पाठवले, तेच पवार आज मोदी-शाहांना मदत करायला निघालेत, असा हल्ला काँग्रेसने चढवला. तर इकडे शिवसेनेने देखील पवारांना इशारा दिला आहे. पवारांची एवढी काय मजबुरी आहे की त्यांनी लोकशाहीचा गळा आवळणार्या विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतलीये. असे असेल तर आम्ही शांत बसणार नाही, असे राऊत म्हणाले.
मोदी-शाहांचे हात बळकट करणे हा महाराष्ट्रद्रोह
शरद पवारांनी भाजपशी हातमिळवणी केल्यास आम्ही सहन करणार नाही. मोदी-शाहांचे हात बळकट करणे हा महाराष्ट्रद्रोह आहे. हे विधेयक लोकशाहीचा गळा आवळणारं आहे. असे असतानाही त्यांनी पाठिंब्याची भूमिका घेतली असेल तर पवारांची राष्ट्रवादी कोणत्या तोंडाने इंडियाच्या बैठकीला जाणार? पवारांच्या सहकार्यांनी माती खाल्ली, सत्तेत जाण्याची घाई काहींना झालीये, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
राष्ट्रवादीने सत्तेत जाण्याआधी मलिक-देशमुखांची माफी मागितली पाहिजे
पवारांचा पक्ष नेहमी फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेतो. यापुढे आता त्यांना महापुरूषांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. सत्तेत जाण्याआधी शरद पवार यांच्या पक्षाने नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची माफी मागितली पाहिजे. कारण त्यांनी भाजपला अंगावर पक्षासाठी तुरूंगवास भोगला, असे राऊत म्हणाले.