आजपासून शहरात घुमणार आवाज

Foto
 
औरंगाबाद: लोकसभा निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. मतदानासाठी केवळ आठवडाभराचा कालावधी शिल्‍लक असल्याने राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आता एक गठ्ठा मते असलेल्या शहरावरच प्रचाराचा रोख  केंद्रित केला आहे.  त्यामुळे आजपासून शहरात प्रचाराचा धुराळा उडणार असे दिसते.  यंदा लोकसभेची निवडणूक अत्यंत रंगतदार स्थितीत येऊन पोहोचली आहे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या मतांमध्ये वाटेकरी झाल्याने चौरंगी लढत अटळ होईल, असे दिसते. गेल्या आठ दिवसांपासून शिवसेनेने ग्रामीण भागात जोरदार प्रचार केला. काँग्रेसचे आमदार सुभाष झांबड यांनी गंगापूर, वैजापूर, कन्‍नडसह सर्वच विधानसभा मतदारसंघात जोरदार प्रचार यंत्रणा राबवली. हर्षवर्धन जाधव यांनी कन्‍नडपासून सुरू केलेला प्रचार वैजापूर, गंगापूर तालुक्यासह ग्रामीण भागातही पोहोचवला. एमआयएमने शहरावर अधिक लक्ष केंद्रित केले तरी ग्रामीण भागातही प्रचार यंत्रणा चांगली राबवली. त्यामुळे त्यांना ग्रामीण भागातूनही चांगल्या मतदानाची अपेक्षा आहे. शिवसेनेने आजपासून शहरात प्रचाराचा जोर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर लगेचच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सभा होणार आहेत. यापुढील काळात सेना शहरावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणार, असे दिसते. दरम्यान, विरोधी पक्ष काँग्रेस, एमआयएम तसेच शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी शहराच्या रस्ते, पाणी, कचरा प्रश्‍नावर खा. चंद्रकांत खैरे यांना कोंडीत पकडले. मात्र, गेला आठवडाभर खैरे यांनी याबाबत चकार शब्दही उच्चारला नाही. आता विरोधकांच्या टीकेला खैरे कसे उत्तर देतात याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.