मनपाला कोरोनासाठी निधी देण्यावरून

Foto
शहर-ग्रामीण लोकप्रतिनिधी आमने-सामने
सेना आमदार आग्रही ; आ. सावेंचा पाठिंबा आ. बंब पडले एकाकी 
डीपीडिसीतून मिळणार का निधी!
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून महानगरपालिकेला मिळणार्‍या निधीवर भाजप आमदार प्रशांत बंब यांनी प्रश्न उपस्थित करताच शिवसेना आमदार आक्रमक झाले आहेत. बंब कुठेही नाक खुपसतात, असा टोला आ. संजय शिरसाट यांनी लगावला तर सध्या जीव वाचविणे महत्त्वाचे असे सांगत आमदार अंबादास दानवे यांनीही बंब यांच्यावर तोफ डागली. दुसरीकडे भाजप आ. अतुल सावे यांनीही मनपाला निधी देण्यास हरकत नसल्याचे सांगितल्याने आ. बंब एकाकी पडले आहेत.
महानगर पालिकेचे बजेट एक हजार कोटींचे असताना कोविडसाठी स्वतःचा निधी का वापरत नाही, ग्रामीण विकासासाठी असलेल्या डीपीडीसीच्या निधीवर महानगरपालिकेचा डोळा असल्याचा आरोप भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर आता सेना नेते आक्रमक झाले आहेत. आ. दानवे म्हणाले, शहर ग्रामीण हा वाद उभा करण्यात अर्थ नाही. डीपीडीसीतून शहराच्या विविध विकास कामांना नेहमीच निधी दिला जातो. दलित वसाहती, नगरोत्थान तसेच वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी डीपीडीसीचा निधी शहराला मिळत असतो. मात्र सध्या कोरोना महामारीच्या काळात इतर विकास कामे नसल्यामुळे महानगरपालिकेला वैद्यकीय सेवेसाठी निधी देण्यास काही हरकत नाही, असे आ. दानवे यांनी सांजवार्ताशी बोलताना स्पष्ट केले. शहरात जिल्हाभरातून रुग्ण दाखल होत आहेत. मराठवाड्यातूनही रूग्ण औरंगाबादेत दाखल होतात अशा वेळी शहरी ग्रामीण असा भेद करणे उचित ठरणार नाही. सध्याच्या काळात लोकांचे जीव वाचविणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे बंब यांनी नाहक वाद उपस्थित करू नये, असा सल्ला त्यांनी दिला.
मनपाला मिळणार का 38 कोटी!
दरम्यान महानगरपालिकेला यापूर्वी डीपीडीपीतून 17 कोटी निधी देण्यात आला होता. मात्र आता दोन महिन्यांपासून तब्बल 38 कोटींचे प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे पडून आहेत. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे आता महानगरपालिकेने कैफियत मांडली आहे. जिल्हा नियोजन समितीची उद्या बैठक होत असून या बैठकीत पालकमंत्री देसाई या प्रस्तावांना मंजुरी देतात का, याकडे आता लक्ष लागले आहे.
बंब कुठेही नाक खुपसतात : आ. शिरसाट
 शिवसेना पश्चिमचे आ. संजय शिरसाट यांनी बंब यांच्यावर तोफ डागली. महानगरपालिका आर्थिक अडचणीत असताना अन कोरोनाचे संकट असताना असा प्रश्न उपस्थित करणे वेडेपणाचे आहे. या संकटाच्या काळात शासनाचा सर्व निधी उपचारावर खर्च करण्याचा निर्णय घेतला असताना आता ग्रामीण विकास कामांबाबत आरडाओरड करण्यात अर्थ नाही. डीपीडीसीतून अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी निधी दिला तर बिघडले कुठे? मात्र आमदार बंब यांना कुठेही नाक खुपसण्याची सवयच आहे, असा टोला शिरसाट यांनी लगावला.
निधी देण्यास हरकत नाही ः आ. सावे
भाजप पूर्वचे आ. अतुल सावे यांनी डीपीडीसीतून मनपाला निधी देण्यास काहीच हरकत नसल्याचे सांगत समर्थन केले. जिल्हा नियोजन समितीतून शहराला निधी मिळतच असतो. शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणी निधी देण्याची तरतूद आहे. सध्या कोविड परिस्थितीमुळे शहरातील वैद्यकीय यंत्रणेवर मोठा ताण आहे. ग्रामीण भागातूनही रुग्ण उपचारासाठी येथे दाखल होतात. त्यामुळे मनपाला निधी देण्यास काहीच हरकत नाही असे सांगत भाजपचेच आमदार अतुल सावे यांनी एक प्रकारे आमदार प्रशांत बंब यांच्या भूमिकेला विरोध दर्शवला.
आ. प्रशांत बंब एकाकी!
दरम्यान, महानगरपालिकेच्या कारभारावर टीका करीत कोविडसाठी डीपीडिसीतून निधी न घेता मनपाने स्वतः निधी उभारावा, अशी मागणी करणार्‍या आमदार बंब यांना लोकप्रतिनिधींनी समर्थन दिले नाही. या विषयावर सेना आमदार आक्रमक झाल्याचे दिसून आले. तर भाजपकडून कोणीही बंब यांच्या समर्थनार्थ उभे राहिले नाही. त्यामुळे डीपीडीसी प्रकरणात बंब एकाकी पडल्याचे दिसून आले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker