छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहागंज परिसरात फळ विक्रेत्यांनी बुधवारी (दि.२५) सायंकाळी एका गर्भवती महिलेसह पतीला पोलिस चौकीसमोरच मारहाण केली. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी पोलिस आयुक्तांशी संपर्क साधला. त्यावरून इम्रानसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले तसेच या हातगाड्या तातडीने हटविण्यात याव्यात, अशी सूचनाही उपमहापौरांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.
शहरात दिवसेंदिवस हातगाडी व्यावसायिकांची संख्या वाढत आहे. यात फळ विक्रेत्यांचे प्रमाण अधिक असून, मुख्य बाजारपेठेतील प्रत्येक रस्ते या व्यावसायिकांनी गिळंकृत केले आहेत. याविरोधात महापालिका नेहमीच थातूरमातूर कारवाई करताना दिसते. पथक येणार याची माहिती अगोदरच या पथकातील काही इमारत निरीक्षकच व्यावसायिकांना देतात. त्यामुळे पथक येण्यापूर्वीच हातगाड्या रस्त्यावरून गायब झालेल्या असतात. शहरात सर्वाधिक फळविक्रेत्यांच्या हातगाड्या शहागंज परिसरात आहेत. तसेच पैठणगेट, सिटी चौक आणि रंगारगल्ली या परिसरात हातगाड्यांनी रस्ते गिळंकृत केले आहेत. बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास फळ घेण्यावरून वाद झाला. बाचाबाची झाल्यानंतर महिलेला आणि त्यांच्या पतीला मारहाण केली. हा प्रकार शहागंज येथील बंद पोलिस चौकीसमोर घडला. याच वेळी तेथून उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचे काही कार्यकर्ते जात होते. त्यांनी या घटनेचा व्हिडिओ तयार करून माहिती घेतली. तसेच हा प्रकार उपमहापौरांना सांगितला. त्यानंतर जंजाळ यांनी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी इम्रानसह तिन्ही मुजोर हातगाडीधारकांना ताब्यात घेतले आहे.
बंद पोलिस चौकीत शिरून मारहाण
शहागंज प्रमुख बाजारपेठ असल्याने नेहमीच येथे मोठी वर्दळ असते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी पोलिस चौकी देण्यात आली आहे. मात्र घटना घडली तेव्हा पोलिस चौकीत कोणीही हजर नव्हते. बाहेरून दाराला कडी लावलेली होती. टवाळखोरांची हिम्मत एवढी की, चौकीत जाऊन त्यांनी फिर्यादीला जबर मारहाण केली. त्यामुळे पोलिसांचा धाक उरला नाही का, असा सवाल नागरिक विचारात आहेत.
हातगाड्यांचे अतिक्रमण काढा : जंजाळ
शहरातील मुख्य बाजारपेठेतील व्यापारी लाखो रुपये खर्चुन दुकान घेतो. त्यात लाखोंचा माल खरेदी करून व्यवसाय करतो अन् हातगाडीधारक त्यांच्या दुकानासमोर अतिक्रमण करून व्यवसाय करतात. शहरातील प्रत्येक रस्त्यावर हा प्रकार आहे. आता तर या हातगाडीधारकांची मुजोरी वाढली असून, थेट नागरिकांना मारहाण करीत आहेत. रस्त्याच्या मध्यभागापर्यंत हातगाड्या लागलेल्या असतात. त्यामुळे सर्व अतिक्रमित हातगाड्या हटविण्याची सूचना महापालिका आयुक्तांना केली आहे.









