पीक विम्यासाठी ११ हजार कोटींचा निधी-खोत

Foto

औरंगाबाद: शेतकर्‍यांना पीक विमा लवकर मिळावा यासाठी राज्य शासनाने ११ हजार कोटी रुपयांचा निधी वितरीत केला आहे. महसुलच्या अधिकार्‍यांनी पिक विम्याची रक्कम शेतकर्‍याच्या खात्यात लवकरात लवकर कशी पडेल, जमा होईल यासाठी प्रयत्न करावेत असे आदेश आज राज्याचे कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कृषीपणन मंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार दुष्काळ पाहणी दौर्‍यावर आले. आज त्यांनी वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथील कैलास पाटील संस्थेच्या चारा छावणीला भेट दिली.यावेळी शेतकर्‍यांसोबत संवाद साधतांना ते पुढे म्हणाले की, राज्य सरकार दुष्काळी कामाला प्राधान्य देत आहे. माणसे आणि जनावरांना पिण्यास पाणी तसेच जनावरांना चारा देण्यासाठी योग्य ते प्रयत्न करीत आहे. ज्या शेतकर्‍यांनी पीकविमा काढलेला आहे. अशांना विमा देण्यास काही कंपन्या टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अधिकार्‍यांनी यात लक्ष घालून शेतकर्‍याच्या खात्यावर पिक विमा जमा होण्यासाठी प्रयत्न करावेत. उन्हाळा संपण्यास 15 दिवस शिल्लक असतांना मंत्री खोत आल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी मंत्री सदाभाऊ खोत यांना आता उन्हाळा संपण्यापूर्वी आमचे हाल पाहण्यास आलात का? असा प्रश्‍न उपस्थित केला. व त्यांना धारेवर धरले. त्यावेळी खोत यांनी निवडणूक प्रचारामुळे येऊ शकला नसल्याचा खुलासा केला. 

यावेळी त्यांनी चारा छावणीत गुरे असलेल्या शेतकर्‍यांचे प्रश्‍न समजून घेतले. यावेळी वैजापूरचे आदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, अजय सोळुंके, चंद्रशेखर साळुंके, प्रदिप जाधव, संतोष निकम, अनिल पवार, संतोष सुर्यवंशी, अधिकारी वर्ग उपस्थितीत होते. 

चारा छावण्या बंद करण्याबाबत तहसीलदारांना पत्र 
वैजापूर तालुक्यातील दुष्काळजन्य स्थिती पाहता ग्रामीण भागात जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. सरकारने तालुक्यात चार ठिकाणी चारा छावण्या सुरू केल्या आहेत. त्यात गारज, लोणी खुर्द, शिवूर व खंडाळा या गावांमध्ये या चारा छावण्या सुरू आहेत. प्रत्येक छावणीत दोन ते तीन हजार जनावरे आहेत. प्रत्येक छावणी चालकाला जनावरांना चारा आणि पाणी द्यावे लागत आहे. शासन नियमानुसार छावणी चालकाला तीन दिवसाला खर्चाचे धनादेश देणे बंधनकारक आहे. वैजापूर तालुक्यात 1 एप्रिलपासून या चारा छावण्या सुरू केल्या आहेत. आज 45 दिवस उलटले आहेत. परंतु अद्यापपर्यंत शासनाने व जिल्हा प्रशासनाने चारा छावणी चालकाला एक रुपयाही दिलेला नाही. लोणीखुर्द येथील चारा छावणीमध्ये दोन हजार 982 जनावरे आहेत. त्यात दोन हजार 434 मोठे तर 548 छोटी जनावरे आहेत. दररोज चारा पाण्यावर दोन लाख 30 हजार रुपये खर्च होतात. गेली 45 दिवस छावणी चालक स्वतः खर्च करीत आहेत. आतापर्यंत एक कोठीच्यावर खर्च केला आहे. पण यापुढे खर्च करणे शक्य नसल्याने वैजापूर तालुक्यातील चारही छावणी चालकांनी वैजापूर तहसीलदारांना पत्र देऊन आतापर्यंत झालेला खर्च देण्यात यावा. तसेच चारा छावणी बंद करण्याबाबत पत्र दिले आहे. तहीसीलदारांना पत्र देऊन 8 दिवस उलटले तरी प्रशासन अजूनही झोपेत आहे. एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात दुष्काळासाठी निधी कमी पडू देणार नाही. मग माशी शिंकली कुठे, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

जनावरांना मिळणारे खाद्य कमी
चारा छावणीतील मोठ्या जनावराला 18 किलो व लहान जनावराला 10 किलो वैरण मिळणे आवश्यक आहे. पण प्रत्यक्षात छावणीतील मोठ्या जनावराला साडे सात किलो व लहान जनावराला 4 किलो चारा मिळतो अशा शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत. ओला चार्‍यामध्ये मका आणि ऊस तर सुक्या चार्‍यामध्ये  चनाकुटी, सोयबीन, तूर व गहू यांची कुट्टी दिली जाते. लोणीखुर्द येथील चारा छावणीत जनावरांसाठी मुबलक प्रमाणात पाणी मिळते. या छावणीवर दररोज 18 टँकर पाणी आणले जाते. मन्याड धरणातून टँकरने पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे पाणी टंचाई नसल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.