अंबादास दानवे, एकनाथ जाधव, राजेंद्र ठोंबरे यांचे भवितव्य धोक्यात; युतीच्या फार्म्युल्याने अनेकांचे पत्ते होणार कट

Foto
औरंगाबाद: लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती हेणार आहे. तसेच सध्या ज्या जागांवर उमेदवार निवडून आले आहेत ते मतदार त्याच पक्षाकडे राहणार असल्याचे पुढे येत असल्याने सेना-भाजपामधील अनेकांचे राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे. 

सन 2014 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या. शिवसेना आणि भाजपाने स्वबळावर या निवडणुका लढल्या. यावेळी मात्र दोन्ही पक्षाची युती राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातून आमदार होऊ इच्छिणार्‍या अनेकांचे स्वप्न धुळीस मिळणार आहे. जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदार संघ आहेत. या नऊ मतदारसंघापैकी पैठण, औरंगाबाद पश्‍चिम आणि कन्नड मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. तर गंगापुर औरंगाबाद पूर्व आणि फुलंब्रीतून भाजपा उमेदवार विजयी झाले होते. तर वैजापूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस, सिल्लोडमधून काँग्रेस आणि औरंगाबाद मध्य मधून एमआयएम उमेदवार विजयी झाले होते. 2014 मध्ये फुलंब्री मतदार संघातून हरिभाऊ बागडे विजयी झाले. त्यांच्याविरुद्ध शिवसेनेने जि.प.चे माजी अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांनी लढत दिली होती. या ठिकाणी आता भाजपा लढणार असल्याने राजेंद्र ठोंबरे यांची राजकीय कोंडी होणार आहे. गंगापूर मधून भाजपाचे प्रशांत बंब विजयी झाले. त्यांच्याविरुद्ध सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे होते. वैजापूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब पाटील चिकटगावकर विजयी झाले. तेथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष एकनाथराव जाधव व शिवसेनेतर्फे आर.एम. वाणी लढले होते. पैठणमधून शिवसेनेचे संदिपान भुमरे विजयी झाले. त्यांच्या विरोधात विनायक हिवाळे होते. औरंगाबाद पूर्वमधून भाजपाचे अतुल सावे विजयी झाले. त्यांच्याविरुद्ध माजी महापौर कला ओझा, पश्‍चिममध्ये संजय शिरसाट यांच्याविरुद्ध मधुकर सावंत, मध्यमध्ये एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले. त्यांच्याविरुद्ध सेनेकडून प्रदिप जैस्वाल तर भाजपातर्फे किशनचंद तनवाणी, सिल्लोडमध्ये आ. अब्दुल सत्तार विजयी झाले. त्यांच्याविरुद्ध  भाजपातर्फे सुरेश बनकर उमेदवार होते. तर कन्नडमधून सेनेतर्फे हर्षवर्धन जाधव विजयी झाले. त्यामुळे आता 2019 मध्ये होणार्‍या निवडणुकीमध्ये भाजपा सेनेने युती करुन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सध्या विधानसभेच्या मतदार संघात ज्या पक्षाचे आमदार विजयी झाले आहेत. ते त्या पक्षासाठी मतदार संघ राहणार आहेत. युतीच्या या नवीन फार्म्युल्यामुळे जिल्ह्यातील सेना आणि भाजपामधील मातब्बर नेत्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे व भाजपाचे जिल्हाध्यक्ष एकनाथराव जाधव, राजेंद्र ठोंबरे, विनायक हिवाळे, कला ओझा, दिनेश परदेशी, सुरेश बनकर यांची राजकीय कोंडी झाली आहे. औरंगाबाद मध्य, सिल्लोड व वैजापूरच्या जागा कोण कोणाला सोडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.