गॅस लीक करून भावी डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : परदेशात एमबीबीएसचे शिक्षण घेणार्‍या एका २८ वर्षीय विद्यार्थ्यांनी आर्थिक विवंचना आणि धाकट्या भावाचे गंभीर आजारपण यातून आलेल्या नैराश्यातून स्वतःला खोलीत कोंडून घेत गॅस लीक करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मुकुंदवाडी भागात मंगळवारी (दि.३१) रात्री नऊच्या सुमारास हा थरार घडला. मात्र मुकुंदवाडी पोलिसांनी आणि अग्रिशमन दलाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे या तरुणाचे प्राण वाचले.
हा तरुण परदेशात एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. त्याचे वडील शासकीय सेवेत आहेत, त्याच्या लहान भावावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याचा महिन्याचा खर्च लाखाच्या घरात आहे. आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने भावाला जनरल वॉर्डमध्ये हलवण्याची चर्चा सुरू झाली, पण भावाला चांगले उपचार मिळावेत यासाठी त्याचा त्यास विरोध होता. परदेशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जीवन मानसिक तणावात होता. काही महिन्यांपूर्वी तो भारतात परतला होता. व्हिसा नूतनीकरणासाठी लागणारी आर्थिक तरतूद आणि शिक्षणाचा खर्च यामुळे तो खचला होता. भावाच्या उपचारासाठी आणि स्वतः च्या शिक्षणासाठी प्लॉट विकावा, अशी त्याची इच्छा होती, मात्र त्यावरून वाद झाले आणि त्याने टोकाचे पाऊल उचलले. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास त्याने स्वतःला खोलीत कोंडून गॅस सिलिंडर सुरू केले. घाबरलेल्या वडिलांनी डायल ११२ वर कॉल केला. मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे अंमलदार संजय बिमरोट आणि सहकारी अगोदर घटनास्थळी गेले. त्यानंतर निरीक्षक सचिन इंगोले यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून ताफ्यासह धाव घेतली आणि अग्निशमन दलाला पाचारण केले.