गल्लेबोरगाव : मारुती मंदिरात शिवमहापुराण कथेचा भक्तिभावात प्रारंभ

Foto
खुलताबाद, (प्रतिनिधी) : तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील मारुती मंदिरात शिवमहापुराण कथेचा भक्तिमय वातावरणात गुरुवारी (दि.८) शुभारंभझाला आहे. विधीवत पूजन, कलशस्थापना व मंत्रोच्चाराने कथेची सुरुवात करण्यात आली.

या शिवमहापुराण कथेचे प्रवचन श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून सुरू असून परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. स्वामी शिवगिरीजी महाराज यांनी आपल्या प्रवचनातून शिवमहापुराणाचे आध्यात्मिक व धार्मिक महत्त्व विशद केले. भगवान शंकराची लीला, भक्तांची श्रद्धा, वैराग्य, संयम व मानवजीवनातील सदाचार यांचे सुंदर उदाहरण देत त्यांनी कथावाचन केले. शिवभक्तांनी मोठ्या श्रद्धेने कथा श्रवणाचा लाभघेतला. प्रवचनादरम्यान हर हर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.

 या कथेच्या निमित्ताने मारुती मंदिर परिसर फुलांनी व आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आला आहे. या धार्मिक कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मारुती मंदिर समिती, ग्रामस्थ व तरुण मंडळाने विशेष परिश्रम घेतले आहेत. कथाकालावधीत भाविकांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. शिवमहापुराण कथेमुळे गल्लेबोरगाव परिसरात धार्मिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून गावात उत्साहाचे वातावरण आहे. गावासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या वाणीतून सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.