सिल्लोड शहरासह तालुक्यात गणेश विसर्जन उत्साहात

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) सिल्लोड शहरात गणेश विसर्जन उत्साहात व शांततेत पार पडले. सकाळी ११ वाजल्यापासून शहरातील पारंपरिक विसर्जन स्थळ श्री महादेव मंदिर तसेच नगर परिषदेच्या वतीने पाझर तलाव परिसरात उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावात गणेश विसर्जनाला सुरुवात झाली होती. दिवसभर विविध गणेश मंडळांच्या गणरायांचे विधिवत विसर्जन करण्यात आले. 

सिल्लोड तालुका व शहर गणेश महासंघाच्या गणरायाचे दुपारी १ वाजता पाझर तलाव परिसरात नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावात विधिवत विसर्जन करण्यात आले. गणेश विसर्जनासाठी नगर परिषदेच्या वतीने कृत्रिम तलावासह गणेशभक्तांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. विसर्जनस्थळी गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. दरम्यान, विसर्जन मिरवणुकीत विविध गणेश मंडळांनी सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे सादरीकरण केले.


अनेक मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. विसर्जनस्थळी येणाऱ्या गणेशभक्तांसाठी सिल्लोड तालुका व शहर गणेश महासंघाच्या वतीने मसाला दुधाचे आयोजन करण्यात
आले होते. 

यावेळी नगराध्यक्ष तथा गणेश महासंघाचे स्वागताध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, गणेश महासंघाचे अध्यक्ष केशवराव तायडे, मार्गदर्शक तथा उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, कार्याध्यक्ष नंदकिशोर सहारे, सुधाकर पाटील, किशोर अग्रवाल, जितेंद्र आरके, संजय फरकाडे, प्रशांत क्षीरसागर, राजीव गौर, गणेश पाटील, संतोष खैरनार, सुनील दुधे, सुदर्शन अग्रवाल, विजय खाजेकर, प्रमोद दौड, महेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. सिल्लोड शहरात गणेशोत्सवाचा उत्सव उत्साहपूर्ण, भक्तिमय आणि शांततेत पार पडला.