छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : बनावट नोटा तयार करून देण्याचे आमिष दाखवून हातचलाखीने नागरिकांची लुबाडणूक करण्यासाठी आलेल्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई २७ फेब्रुवारीला दुपारी २:३० वाजेच्या सुमारास पहाडसिंगपुरा भागात करण्यात आली. शेख फेरोज शेख रफिक (३१) आणि शेख वसीम शेख ताहेर (२९, दोघेही रा. बिलोली, नांदेड) अशी आरोपींची नावे आहेत.
अधिक माहितीनुसार, बेगमपुरा पोलिसांना इनोव्हा कारमधून (टीएस-०७-जेडब्ल्यू-०६६६) दोन जण पहाडसिंगपुरा भागात बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून उपनिरीक्षक मारोती मदेवाड यांच्या पथकाने दुपारी २.३० वाजेच्या सुमारास न्यू पहाडसिंगपुरा येथील मुख्य रस्त्यावरील महादेव मंदिराजवळ सापळा रचला. तेथे उभी असलेली संशयित इनोव्हा कार आणि त्यातील दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींच्या कारची झडती घेतली असता ५०० रुपयांच्या नोटांच्या आकाराचे पांढर्या कागदांचे बंडल, प्लायवूडचा चौकोनी बॉक्स (ज्यावर बटणे, प्लग, लाईट्स आणि व्होल्टेज मीटर लावून मशीनसारखे रूप दिले होते), आयोडीन द्रव्य असलेली प्लास्टिकची बाटली, वायर्स आणि पांढरी पावडर असा एकूण १,१५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चार दिवसांपूर्वीच मालेगाव पोलिसांनी बनावट नोटांप्रकरणी शहरातून मुख्य सूत्रधार संतोष केळसकर याला अटक केली होती.










