छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : तू हमारे खिलाफ पुलीस मे कंम्प्लेंट करता क्या, असे म्हणत टोळक्याने युवासेनेच्या उपशहर संघटकासह दोघा भावांवर हल्ला केला. त्यांना बेदम मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ केली. घटनेची माहिती मिळताच अवघ्या पाच ते दहा मिनिटांत पोलीस दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत केले. सादातनगर-राहुलनगरात दि. २२ मार्चच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास हा राडा झाला. या प्रकरणी जमावाविरुद्ध सातारा ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.
अरबाज कय्यूम शेख (२५), समीर कासीम कुरेशी (३१) आणि सद्दाम कासीम कुरेशी (३४, तिघे रा. राहुलनगर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तिघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. हबीब, शेख सलमान, सद्दाम कुरेशी, अझहर, बोक्या आणि त्याचा लहान भाऊ आदींचा पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर यांनी दिली. श्रीकांत रोहिदास काकडे (२६, रा. गल्ली नं २, राहुलनगर) हे फिर्यादी आहेत. ते युवा सेनेचे उपशहर संघटक आहेत. दि. २२ मार्चच्या रात्री साडेदहा वाजता ते कांचनवाडी येथे असताना त्यांचा भाऊ मंगेशचा त्यांना फोन आला. श्रीकांतने तत्काळ घराकडे धाव घेतली. त्यांची दुचाकी घराजवळ पोहोचताच आरोपी समीर कुरेशी, हबीब, शेख सलमान, सद्दाम कुरेशी, अरबाज ऊर्फ बाबा, अझहर, बोक्या आणि बोक्याचा भाऊ आदींनी श्रीकांतला अडविले. जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण सुरु केली. मंगेशने वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असता जमावाने त्यांनाही मारहाण केली. परिसरातील लोकांनी त्यांची जमावाच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर ते दोघेही घरात पळून गेले.












