व्यापाऱ्यांना गंडा घालणारी टोळी अटकेत गुन्हे शाखेची कारवाई; ४ लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): पैसे फोन पेद्वारे पाठवल्याचे खोटे भासवून, बनावट अॅपच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या एका टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार आणि दोन वेल्डिंग मशीन असा एकूण ४ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
योगेश विनायक गव्हाणे (३५, रा. कमळापूर, वाळूज), नितीन अनिल मुसमाडे (३३, रा. कमळापूर, वाळूज) आणि खी सुभाष राठोड (३४, रा. बजाजनगर, वाळूज) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर बुधवारी (दि.२२) यांनी
दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल सुरेश खाडेकर (रा. जाधववाडी) यांच्या मोंढा नाका येथील वैभव मशिनरी या दुकानात रविवारी (दि.१९) दुपारी आरोपी आले होते. त्यांनी सीओ-२ वेल्डिंग मशीन खरेदी केली. त्यानंतर पैसे देण्याची वेळ आली असता त्यांनी आपल्या मोबाईलमधील एका नकली फोन पे अॅपवरून पैशाचा व्यवहार यशस्वी झाल्याचे खोटे
स्क्रिन शॉट दाखवले आणि मशीन घेऊन पोबारा केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खाडेकर यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, फसवणूक करून नेलेली वेल्डिंग मशीन आरोपी योगेश गव्हाणे याच्या मोरे चौक (वाळूज) येथील वायएस इंटरप्रायजेसमध्ये लपवून ठेवल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळताच पथकाने छापा मारून
आरोपींना बेड्या ठोकल्या.
आणखी एका
दुकानदाराला गंडा
आरोपींना पोलिसी खाक्या
दाखविताच त्यांनी एमआयडीसी वाळूज परिसरातील कोलगेट चौकातील एका हार्डवेअर दुकानातूनही अशाच प्रकारे फेक अॅपचा वापर करून दुसरी एक मशीन लांबवल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी दोन्ही वेल्डिंग मशीन जप्त केल्या. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त (गुन्हे) रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, सायबरचे एपीआय कदीर देशमुख, उपनिरीक्षक अर्जुन कदम, अंमलदार योगेश गुप्ता, श्रीकांत काळे, राजेंद्र साळुंके आणि त्यांच्या पथकाने केली.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions