गंगापूर : तालुक्यातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारी गंगापूर ते श्रीरामपूर ही एसटी बससेवा अखेर सुरू करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, प्रवास अधिक सुलभ आणि किफायतशीर होणार आहे. यापूर्वी श्रीरामपूरला एसटीने जाण्यासाठी नागरिकांना गंगापूर-नेवासा-श्रीरामपूर असा वळसा घालून प्रवास करावा लागत होता.
त्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढत होते. गंगापूर - वाहेगाव गाढे पिपळगाव - नागमठाण - मुद्देश वडगाव हरेगाव - श्रीरामपूर या मार्गान थेट बससेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत होती. गंगापूर पंचायत समितीचे उपसभापती राजेश्वर हिवाळे व दिलीप मनाळ यांनी आमदार रमेश बोरणारे यांच्याकडे पाठपुरावा केला. आ. बोरनारे यांनी गंगापूर आधार व्यवस्थापक यांना नागरिकांची मागणी लक्षात घेता बस सेवा सुरू करण्याचे पत्र दिले.
आमदार बोरनारे व एसटी आगार प्रमुख यांच्या सहकार्यामुळे अखेर ही बससेवा सुरू करण्यात आली. ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, कामगार, शेतकरी व व्यावसायिक यांना श्रीरामपूर येथेजाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. अनेकांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता.
मात्र, आता एसटी सेवा सुरू झाल्याने प्रवास सुरक्षित, सोयीस्कर आणि परवडणारा झाला आहे. गंगापूर आगाराने घेतलेल्या यानिर्णयामुळे ग्रामीणभागातील गावांना थेट जोड मिळाली आहे.
ही बस सेवा दररोज दोन फेऱ्या करणार असल्याने प्रवाशांना वेळेचीही सुविधा मिळणार आहे. स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत लोक प्रतिनिधी प्रशासनाचे आभार मानले. ही सेवा नियमित व सुरळीत सुरू ठेवण्याची मागणीही या वेळी करण्यात येत आहे.















