आंबेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग
गंगापूर, (प्रतिनिधी) : शिक्षण विभागांतर्गत केंद्र गंगापूर येथील केंद्रस्तरीय शिक्षण परिषद मंगळवारी (२९ सप्टेंबर) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आंबेवाडी येथे दुपारी १२ ते ४ या वेळेत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी केंद्र समूह समन्वयक सचिन गोपाळे, केंद्रीय मुख्याध्यापक विजय तुपे, मूल्य संवर्धन समन्वयक अजित पवार तसेच विशेष शिक्षक युसुफ हसमी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी केंद्रीय मुख्याध्यापक विजय तुपे यांनी प्रास्ताविकातून शिक्षण परिषदेच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. तसेच शाळांमधील यू -डायस प्लस पोर्टलवरील माहिती वेळेत व अचूक भरण्याबाबत शिक्षकांना सविस्तर मार्गदर्शन केले. केंद्र समूह समन्वयक सचिन गोपाळे यांनी वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त विविध प्रशासकीय सूचना, परिपत्रके तसेच शैक्षणिक उपक्रमांची सविस्तर माहिती शिक्षकांना दिली. लगड यांनी सूत्रसंचालन केले. परिषदेचा आढावा घेत नवनाथ भोळे यांनी संदर्भात मार्गदर्शन केले. प्रत्येक शाळेतील एका शिक्षकाने नियोजनानुसार मुख्य विषयाच्या आशयावर आधारित शैक्षणिक नियोजन सादर केले.
यावेळी शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध शैक्षणिक विषयांवर चर्चा केली. संघटनेचे नेते सुनील जाधव व संपत शिंदे यांनीही उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. परिषदेला गंगापूर केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. स्मिता साबळे व मंगल सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले. गंगापूर केंद्रातील शिक्षकांच्या उत्स्फूर्त उपस्थिती व सहकार्यामुळे ही केंद्रस्तरीय शिक्षण परिषद अभ्यासपूर्ण आणि यशस्वी वातावरणात पार पडली.













