गंगापूर पोलिसांनी परत मिळवून दिले विवाहितेचे ५ लाख १२ हजार रुपये

Foto
शहर पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या टीमचे नागरिकांकडून होतेय कौतुक

गंगापूर, (प्रतिनिधी) : घरातील संकटे दूर करण्याचे तसेच पतीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याची खोटी भीती दाखवून लक्ष्मी यंत्र व धार्मिक विधीच्या नावाखाली एका विवाहितेची तब्बल ५ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला होता.

या प्रकरणाचा गंगापूर पोलिसांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करून तपास करत तीन आरोपींना अटक केली. आरोपींकडून २ लाख ७७ हजार रुपये रोख आणि २३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, असा एकूण ५ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींनी घरातील संकटे दूर करण्याचे आमिष दाखवून तसेच विवाहितेच्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याचे सांगून तिच्या मनात भीती निर्माण केली. त्यानंतर लक्ष्मी यंत्र तसेच विविध धार्मिक विधी करण्याच्या नावाखाली तिच्याकडून पैसे व दागिने घेत फसवणूक केली.

या गुन्ह्याचा तपास ग्रामीण अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी, गंगापूर उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे आणि गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विठ्ठल झांजुर्णे यांनी केला.

 गंगापूर पोलिसांच्या तपास पथकातील सपोनि विठ्ठल झांजुर्णे, पोलीस नाईक गणेश जाधव आणि पोलीस अंमलदार अजितसिंग नागलोत यांनी अथक परिश्रम घेत तांत्रिक कौशल्याच्या आधारे कर्नाटक राज्य तसेच जालना व संभाजीनगर जिल्ह्यात तपास केला. तपासादरम्यान तीन आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून २ लाख ७७ हजार रुपये रोख रक्कम तसेच २३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण ५ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 

या प्रकरणात पोलिसांनी शंभर टक्के मुद्देमालाची रिकव्हरी केली असून, मा. न्यायालयाच्या आदेशानुसार हस्तगत केलेला मुद्देमाल फिर्यादी महिलेस परत करण्यात आला. गंगापूर पोलीस निरीक्षक सलीम चाऊस व त्यांची टीमच्या या उल्लेखनीय कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.