उद्या मतदान; ९ फेब्रुवारीला होणार मतमोजणी
गंगापूर, (प्रतिनिधी): गंगापूर तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गटांसाठी ३६ उमेदवार, तर १८ पंचायत समिती गणांसाठी ६७ उमेदवार अंतिम रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गंगापूर तालुक्यातील निवडणूक प्रशासन पूर्णतः सज्ज झाले आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली असून शासकीय अधिकारी
व संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणुकीमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
गंगापूर तालुक्यात एकूण ३४७ मतदान केंद्रांवर २ लाख ९८ हजार ८९२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १ लाख ५५ हजार ७८० पुरुष, १ लाख ४३ हजार ९८ महिला तसेच १४ इतर मतदारांचा समावेश आहे. तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी गटात सर्वाधिक ४४ हजार ७८८ मतदार असून, जामगाव गटात सर्वात कमी २७हजार ६०० मतदार आहेत.
निवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी ३६ उमेदवार, तर पंचायत समितीसाठी ६७ उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. सध्या तालुक्यात निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्रत्येक गटात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.
७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. मतदान प्रक्रिया व मतमोजणीसाठी श्री मुक्तानंद महाविद्यालयाच्या स्ट्राँग रूम व इनडोअर स्टेडियममध्ये सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया व मतमोजणीसाठी सुमारे अडीच हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे पहिले व दुसरे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
गंगापूर तालुक्यात ९ जिल्हा परिषद गट व १८ पंचायत समिती गण असून या गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततेत आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करत पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज आहे. मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन आम्ही करीत आहोत.
- नवनाथ वगवाड, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार, गंगापूर













