आमदार प्रशांत बंब यांचे वर्चस्व
गंगापूर, (प्रतिनिधी) गंगापूर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत आमदार प्रशांत बंब यांचे वर्चस्व कायम राहिले. सभापतीपदी भाजपच्या कविता रविंद्र चव्हाण यांची तर उपसभापतीपदी शिवसेना (शिंदे गट) चे राजेश्वर कल्याण हिवाळे यांची निवड झाली आहे.
मंगळवार (१० मार्च) रोजी दुपारी २ वाजता पंचायत समिती सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक निर्वाचन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी, भूसंपादन विजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभापती पदासाठी भाजपच्या कविता रविंद्र चव्हाण आणि उबाठा गटाचे रावसाहेब मोहन टेके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
उपसभापती पदासाठी शिवसेना (शिंदे गट) चे राजेश्वर कल्याण हिवाळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप सोनवणे यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र प्रदीप सोनवणे यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने राजेश्वर हिवाळे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. सभापती पदासाठी हात वर करून मतदान घेण्यात आले. यामध्ये कविता चव्हाण यांना १३ मते मिळाली,
तर रावसाहेब टेके यांना ५ मते मिळाली. त्यामुळे कविता चव्हाण यांची सभापतीपदी निवड झाल्याचे निर्वाचन अधिकारी विजय राऊत यांनी जाहीर केले. गंगापूर पंचायत समितीमध्ये एकूण १८ सदस्य असून सध्याची पक्षनिहाय ताकद अशी आहे. भाजप ६, शिवसेना ५, राष्ट्रवादी काँग्रेस ३, उबाठा २ आणि अपक्ष २. या समीकरणात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने कविता चव्हाण यांचा विजय निश्चित झाला.
या निवडणूक प्रक्रियेसाठी तहसीलदार नवनाथ वगवाड, गटविकास अधिकारी सुहास वाकचौरे, नायब तहसीलदार सागर वाघमारे, सहायक गटविकास अधिकारी अक्षय भालेकर
तसेच विस्तार अधिकारी मधुकर चव्हाण, अशोक पाटेकर आणि संजय काळे यांनी सहकार्य केले. पंचायत समिती निवडणुकीत जामगाव गटातून दोन अपक्ष सदस्य निवडून आले आहेत. जामगाव गटाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
विकासकामे वेगाने आणि प्रभावीपणे व्हावीत यासाठी आम्ही योग्य त्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेणार आहोत. जामगाव गटातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी रस्ते, पाणी, शिक्षण व इतर मूलभूत सुविधांवर भर देत विकासकामांना गती देण्याचा आमचा प्रयत्न राहील. राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देत जामगाव गटाचा सर्वांगीण विकास साधण्याचा आमचा संकल्प असल्याचेही त्यांनी यावेळी सुमित मुंदडा यांनी सांगितले.
-- पंचायत समितीचे पक्षनिहाय स्थिती --
भाजप ६. शिवसेना ५, राष्ट्रवादी काँग्रेस ३, उबाठा २ आणि अपक्ष २. या समीकरणात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने कविता चव्हाण यांचा विजय निश्चित झाला.















