दोन वर्षांपासून मोजणी प्रलंबित, शेतकरी त्रस्त
गंगापूर, (प्रतिनिधी) तालुक्यातील रहिमपूर येथील शेतकरी आयुब फकीर मोहम्मद खान यांची शेती मोजणी मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असून भूमी अभिलेख कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे संबंधित शेतकरी त्रस्त झाले आहेत.
आयुब खान यांनी गट क्रमांक २ मधील शेती मोजणीसाठी दिनांक २० फेब्रुवारी २०२४ रोजी अधिकृत फी भरून अर्ज केला होता. मात्र, तब्बल दोन वर्षे दोन महिने उलटूनही संबंधित मोजणी करण्यात आलेली नाही. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही मोजणी अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याची तक्रार आहे.
कार्यालयात अनेक वेळा चकरा मारूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, प्रशासनाच्या या निष्क्रियतेमुळे शेती व्यवहार, पीक नियोजन तसेच जमीनविषयक इतर कामे रखडली आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून तात्काळ मोजणी करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन लवकरात लवकर न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी :
याामुळे नागरिक व शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आम्ही नियमानुसार फी भरून अर्ज करतो, तरीसुद्धा दोन-दोन वर्षे मोजणी होत नाही. यामुळे शेतीचे व्यवहार, वाटप आणि कर्ज प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत, अशी प्रतिक्रिया आयुब फकीर मोहम्मद खान या शेतकऱ्याने दिली. तर दुसऱ्या शेतकऱ्याने सांगितले, गंगापूर भूमी अभिलेख कार्यालयाचा ढिसाळ कारभारामुळे आम्हाला वारंवार कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत.
अधिकारी ठोस उत्तर देत नाहीत, त्यामुळे मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन प्रलंबित मोजणी कामे पूर्ण करावीत व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली आहे.












