गंगापूर : सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाचा पंचनामा

Foto
पहिल्याच दिवशी अधिकारी - कर्मचारी गैरहजर; आमदार प्रशांत बंब यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष

गंगापूर, (प्रतिनिधी): येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपस्थित नसल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी आमदार प्रशांत बंब यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून जनतेची कामे वेळेत करावीत, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र संबंधित विभागातील अधिकारीच या सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव शंकरपूर-शिरेसायगाव-वजनापूर-लिंबेजळगाव रस्त्याच्या कामासंदर्भात सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात गेले असता त्यांनी कार्यालयाचा पंचनामा केला. हा पंचनामा गंगापूरचे तलाठी गणेश लोणे यांनी केला. यावेळी कार्यालयात एकूण बारा कर्मचारी कार्यरत असताना केवळ एक लिपिक उपस्थित असल्याचे आढळून आले. अधिकारी व इतर कर्मचारी गैरहजर असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. 

उपअभियंता दिलीप कोलते हे संभाजीनगर येथून ये-जा करत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दिलीप कोलते हे देखील छत्रपती संभाजीनगर येथून अप डाऊन करत असल्याची माहिती समोर आली आहे. जनतेची कामे रखडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. आमदार प्रशांत बंब यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आवाहन करूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसल्याचे या पंचनाम्यातून स्पष्ट झाले आहे.



 आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपस्थित नसल्यामुळे शासकीय कामकाजावर परिणाम
शासन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून जनतेची कामे वेळेत करणे ही त्यांची जबाबदारी आहे. वारंवार सूचना देऊनही अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसतील तर ही गंभीर बाब आहे. जनतेची कामे रखडणार नाहीत यासाठी संबंधित विभागाने तत्काळ सुधारणा करावी, अन्यथा वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून कारवाईची मागणी करण्यात येईल,

- प्रशांत बंब, आमदार

सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात नागरिकांची विविध कामांसाठी सतत ये-जा असते. मात्र आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अधिकारी व कर्मचारी गैरहजर आढळणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. आमदार प्रशांत बंब यांनी मुख्यालयी राहण्याच्या स्पष्ट सूचना दिल्यानंतरही अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडत असून लोकांना विनाकारण हेलपाटे मारावे लागत आहेत. संबंधित विभागाने तात्काळ शिस्त लावून अधिकारी-कर्मचारी वेळेवर उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी.

- संतोष जाधव, सामाजिक कार्यकर्ते